परब्रह्मा प्राप्तीलागीं । कर्मे आचरावी वेगीं ॥१॥
चित्त शुद्ध तेणें होय । भेटी सदगुर्चे पाय ॥२॥
कर्म नित्य नैमित्तिक । प्रायश्चित जाण एक ॥३॥
उपासन ते चवथें । आचरावें शुद्ध चित्तें ॥४॥
तेणें होय चित्त स्थिर । ज्ञानालागीं अधिकार ॥५॥
होय भेटी सदगुरुची । ज्ञानप्राप्ति तैंचि साची ॥६॥
प्राप्त झाल्या ब्रह्माज्ञान । आपण जग ब्रह्मा परिपूर्ण ॥७॥
एका जनार्दनीं भेटला । ब्रह्मास्वरुप स्वयें झाला ॥८॥