मनोभाव जाणोनि माझा । सगुणरुप धरिलें वोजा । पाहुणा सदगुरुराजा । आला वो माय ॥१॥
प्रथम अंतःकरण जाण । चित्तःशुद्ध आणि मन । चोखाळोनी आसन । स्वामीसी केलें ॥२॥
अनन्य आवडीचें जळ । प्रक्षाळिलें चरणकमळ । वासना समुळ । चंदन लावी ॥३॥
अहं जाळियल धूप । सदभाव उजळिला दीप । पंचप्राण हे अमूप । नैवेद्य केला ॥४॥
र्जतम सांडोनी दोन्हीं । विडा दिला सत्त्वगुनीं । स्वानुभवेंण रंगोनी । सुरंग दावी ॥५॥
एका जनार्दनीं पुजा । देवभक्त नाही दुजा । अवघाचि सदगुरुराजा । होवोनि ठेला ॥६॥