श्रीगुरुराया स्वामी दिनानाथा । उद्धरी अनाथा पांडुरंग ॥१॥
गुण निर्गुणरुपा देवा यतिवरा । त्रैलोक्य आधारा पाडुरंगा ॥२॥
रुप वर्णावया नाहीं मज मती । देई तुं बा शक्ति पांडुरंगा ॥३॥
देई मजलागीं प्रभो नित्य शांती । करितों विनंति पाडुरंगा ॥४॥
वदविसी मज तंव सत्ते देवा । देई मज भावा पाडुंरंगा ॥५॥
दशा हें यौवन मज करी बाधा । सांगे स्वयंबोधा पाडूरंगा ॥६॥
तमगुणरजोगुणांतें निरसी । तारी या दासासी पाडुरंगा ॥७॥
असावें मी सदा विषयीं विरक्त । पुरवींमाझे आर्त पाडुरंगा ॥८॥
वससी अंतरीं दासाच्या तुं सदा । आनंदाच्या कंदा पाडुरंगा ॥९॥
धूतपाप व्हावें तुमच्या कृपादृष्टी । सुखाची तुं सृष्टीं पांडुरंगां ॥१०॥
तरती सज्जन तुमच्या दर्शनें । कॄपेचें तुं ठाणें पाडूरंगा ॥११॥
श्रियाळ चांगुना भक्त तारियेले । सत्व रक्षियेलें पाडुरंगा ॥१२॥
पाश हा भ्रांतीचा मजलागीं गोंवा । त्वाचि पैंक तोडावा पांडुरंगा ॥१३॥
दमावी इंद्रियें तेव्हा गुरुभेटी । नको आटाआटी पांडुरंगा ॥१४॥
श्रीद श्रीद माझा समर्थ सदगुरु । देवा तुं आधारु पाडुरंगा ॥१५॥
वन जन सर्व त्वाचि व्यापियलें । स्वरुप शोभलें पांडुरंगा ॥१६॥
लव निमिषभरी तुजविण रहावें । मरणें मज व्हावें पाडुरंगा ॥१७॥
भवसागरांत बुडतों मी देवा । करी माझा काढावा पाडुरंगा ॥१८॥
स्वानंद आरामी मी तो विश्रांमावें । मजलागीं पावावें पाडुरंगा ॥१९॥
मीपणेंनसिलें मजलागीं देवा । देई स्वानुभवा पाडुंरगा ॥२०॥
नृप हा जगाचा परमानंद साचा । वदों माझी वाचा पाडुरंगा ॥२१॥
सिंहासन हृदयीं करोनिया माझ्या । बैसे गुरुराजा पांडुरंगा ॥२२॥
हस्तांत धरावें आपुलिया दासा । हेअ जगन्निवासा पांडुरंगा ॥२३॥
सर्वकाळ चित्ती माझिया वसावें । शुद्ध प्रेम द्यावें पाडुरंगा ॥२४॥
रण कामक्रोध लोभाचें माजलें । निवारी उगलें पाडूरंगा ॥२५॥
स्वभाव हा माझा रजो तमो युक्त । नाशी तुं क्षणांत पांडुरंगा ॥२६॥
तीकडी सांखळी त्रिगुणाची सारी । भव हा निवारी पांडुरंगा ॥२७॥
मनन करावें रात्रंदिवस तुझें । ऐसी कृपा कीजे पांडुरंगा ॥२८॥
हाव ही धरावी सदगुरुपायांची । विनंती दीनाची पाडुरंगा ॥२९॥
रहावें सर्वदा तुझ्या पायांपाशीं । देई तुं वरांसी पाडुरंगा ॥३०॥
जय जय सदगुरो स्वामी तुं समर्थ । पुरवी मनोरथा पाडुरंगा ॥३१॥
एका जनार्दनीं सदगुरों उदारा । दयेच्या सागरा पांडुरंगा ॥३२॥