चला बाई वृंदावनीं रासक्रीडाम पाहुं । नंदाचा बाळ येणें केला नवलाऊ ॥१॥
कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पायां ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥
सर्व गर्व सोडूनी बाई चला हरेपाशीं । द्वैतभाव ठेवुनी पायीं हरिरुप होसी ॥३॥
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥