ज्ञातिकुळ सांडिलें आम्हीं वेंगीं । माय माहेर त्याजिलें तुजलागीं ।

अंग अर्पिलें अंगीचिये अंगीं । शेखीं रतलासे दासी कुब्जेलागीं ॥१॥

सर सर निर्गुणा तु अगुणाचा हरी । जवळीं असतां जालासीं कैसा दुरी ।

चित्त उतटे चितिंता निरंतरी । मन मावळलें न दिसे दृश्यकारी ॥२॥

तुजलागी सांडिला देहसंग । तुजविण विटला विषयभोग ।

जळो तुझा उपदेश सांगसी योग । आम्हा देई सप्रेम संयोग ॥३॥

एक म्हणती गे सांडा शब्द आटी । शब्दा नातुडे कोरड्या ज्ञानगोष्टी ।

आजिचा सुदीन श्रीकृष्नीं झाली भेटीं । हरुषें निर्भर स्वानंद भरली सृष्टी ॥४॥

एक म्हणती गे सांडा शब्दज्ञान । ध्येय जोडलें कोईसें आतां ध्यान ।

भज्य भजन एक झालें भजन । गेली त्रिपुटी मिथ्या मोक्षबंधन ॥५॥

एक म्हणती गे चला मांडु रासु । म्हणे उगवेल मायामय दिवसु ।

दैवें जोडला गे कृष्ण परमहंसु । शोधा निजतत्व सांडोनि आळसु ॥६॥

गोपी मंडळी मिळाली कृष्णापाशीं । जैशीं रश्मि मिनल्या रविबिंबासी ।

कृष्ण भोगितां नाठवे दिननिशीं । एका जनार्दनीं ऐक्यता प्रेमेसी ॥७॥

_________________________________

रासक्रीडा