सुंदर मुख साजिरें कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं ।
गोपवेष शोभे खांदा कांबळी हातीं काठी । तो नंदनंदन देखीला जगजेठी वो ॥१॥
मजुंळ मंजुळ वाजवी मुरली । ऐकता माझी चित्तवृत्ति हरली ॥धृ ॥
चारी वेद जया गाताती आनंदें । तो गोकुळीं गाई चारी परमानंदें ।
श्रुतिशास्त्रें वेधला जयाचिया छंदें । तया गोवळा म्हणती कान्हा आनंदें ॥२॥
ऐशी आवडी भक्तिंची देखा । उच्छिष्ट खातां कांहीं न धरी शंका ।
एका जनार्दनीं भुलला तयाचिया । सुखा वैकुंठ नावडेचि देखा ॥३॥