तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानीं । विव्हळ जालें अंतःकरणी । मी घरधंदा विसरलें ॥१॥

अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥

मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरीला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येउनि हृदयी संचरली ॥२॥

तुझ्या मुरलीचा सुर तान । मी विसरले देहभान । घर सोडोनि धरिलें रान । मी वृंदावना गेले ॥३॥

एका जनार्दनीं गोविंदा । पतितपावन परमानंद । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥४॥