जें सुख संतसज्जनाचे पायीं । तें सुख नाहीं आणिके ठायी ॥१॥
तुकितां या सुखाचेनी तुके । पैं वैकुंठ जाले फिकें ॥२॥
पाहोंजातां लोकीं तिहीं । ऐसें न देखें आणिकें ठायीं ॥३॥
नवल या सुखाची गोडी । हरिहर ब्रह्मा घालिती उडी ॥४॥
क्षीरसागर सांडोनी पाही । अंगें धांवे शेषशाई ॥५॥
एका जनार्दनीं जाली भेटीं । सुख संतोषा पडली मिठी ॥६॥