हरिकिर्तन नामोच्चर । जे नर करिती वारंवार । तया नाही संसार । ब्रह्मादि देव वंदिती ॥१॥
कीर्तनमहिमा नारदु । जाणतसे परमानंदु । जालासे सर्वां बंधु । देवा असुर मानवां ॥२॥
कीर्तनमहिमा परिक्षिती । जाणतसे परम प्रीती । अंतीं सायुज्यता मुक्ती । पावती झाली ॥३॥
कीर्तनमहिमा जाणें शुक । जाणती ते व्यासदिक । वाल्मिकादि सर्व सुख । कीर्तनें सरते ॥४॥
कीर्तनमहिमा जाणें प्रल्हादु । तोदियेला मायाकंदु । कोरडे कांष्ठी गोविंदु । प्रगटला ॥५॥
कीर्तनमहिमा जाणें बळी । याचक झाला वनमाळी । एका जनार्दनीं कली । कीर्तनें न पीडी ॥६॥