विषय विरह गुंतले संसारीं । तया जन्म जन्मातरीं फेरी । कोणी न सोडवी निर्धारीं । यालागी न गुंता संसारीं ॥१॥

मज सोडवा तुम्हीं संतजन । या विषयविरहापासोन ॥धृ ॥

क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर । यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळविया ॥२॥

यासी शरण गेलिया वांचुनी ।संतसंग न जोडे त्रिभुवनी । शरण एकाभावें जनार्दनी । विरह गेला समूळ निरसोनी ॥३॥