येई वो श्रीरंगा कान्हाबाई । विरहाचें दुःख दाटलें हृदयीं । कोण सोडवील यांतुन पाहीं । दैवयोगें सांपडला सगुण देहीं ॥१॥
सगुण निर्गुण याचा वेध । वेधें वेधलें मन झालें सद्गद । वाचा कुंठित हारपला बोध । नेणें आणिक परमानंद ॥२॥
स्थित स्थित मति झाली । वृत्ति विरक्ति हारपली समाधि उन्मनी स्थिरावला । ऐशी विरहाची मति ठेली वो ॥३॥
संगविवर्जित मन झालें । काया वाचा मन चित्त ठेलें । एका जनार्दनीं ऐसें केलें । विरह दुःख निरसिलें ॥४॥