विरहिणी विरहा विरहित बोले । कां वो पुर्वकर्म आड ठेलें ।
वाचें न येती नाम सावळें । तया विरहा मन माझें वेधलें ॥१॥
ऐशा परी बोलती गोपबाळा । कोठें गेला नेणो सांवआळा ।
पहातां पहातां ठकविलें गोपाळा । ऐसा याच विरह लागला ॥२॥
नेणो कांही कर्म आड ठेलें । वियोग वियोगाचें वर्म ऐसें जाले ।
एका जनार्दनीं कौतुक बोले । ऐशा दुःखा विराहिणा बोले ॥३॥