वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग ।

जीवीं जिवला जाला अनंग । भेटता भेटवा मज श्रीरंग ॥१॥

ऐशी विरहिण बोले बोली । कां रे हरी तु सांडी केली ॥धृ ॥

समभाव तुज पहावया । मन आमुचे गुंतलें देवराया ।

तुं तंव मध्यें घालिसी माया । नको आतां विरह पायां ॥२॥

आमुचा विरह कोण निवारी । विरहिनी बोले ऐशिया परी ।

एका जनार्दनी श्रीहरी । जन्ममरणाचा विरह निवासी ॥३॥