प्रथम मत्स्यावतारीं तुमचें अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिकां वैष्णव गाती पवित्र ॥१॥

उठोनि प्रातःकाळीं गौळणीं घुसळन घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरी ध्याती ॥२॥

द्वितीय अवतारीं आपण कच्छरुप झाला । सृष्टी धरुनी पृष्ठी शेवटी सांभाळ केला ॥३॥

तृतीय अवतारीं आपण वराहरुप झाला । धरणी धरुनी दाढे हिरण्याक्ष वधिला ॥४॥

चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रुप । रक्षुनि प्रल्हाद वधिला हिरण्यकश्यप ॥५॥

पांचवें अवतारीं आपाण वामन झाला । बळी घालुनि पाताळीं शेखीं द्वारपाळ ठेला ॥६॥

सहावे अवतारीं आपण परशुराम झाला । धरुनी परशु हातीं सहस्त्रभुजा वध केला ॥७॥

सातवें अवतारी आपण दाशरथी राम । वधोनी राव्ण कुंभकर्ण सुखी देव परम ॥८॥

आठवें अवतारी आपण अवसुदेवाघरीं । वधोनि कंसादिक असुर मारिले भारीं ॥९॥

नववे आवतारीं आपन बौद्धरुप झाला । धरुनियां मौन भक्तघरीं राहिला ॥१०॥

दहावए अवतारीं आपण झालासें वारु । एका जनार्दनीं वर्णिला त्याचा बडिवारु ॥११॥