चिंतनें उद्धरला पापी । महा दोषी केला निःपापी । तया म्हणती ऋषी तपी । पुराणीं तें सर्व ॥१॥
नारदें सांडोनिया मंत्र । केला जगी तो पवित्र । चिंतना एवढें पात्र । आन नाही सर्वथा ॥२॥
चिंतनें शुकादिक मुक्त । राजा जाहला परिक्षित । ऐसें अपार आहेत । चिंतनें मुक्त जाहले ते ॥३॥
चिंतनाची येवढी थोरी । गणिका नारी परद्वारी । वाचे उच्चारितां हरि । मोक्षधामीं बैसविली ॥४॥
चिंतनें हनुमंता समाधी । तुटोनि गेली आधिव्याधी । एका जनार्दनीं बुद्धि । चिंतनीच जडलीसे ॥५॥