चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरीं कांबळीं हातीं काठी । चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥
ऐसा भुकेला चिंतनाचा । न पाहे यातीहीन उंचाचा । काय अधिकार शबरीचा । फळें काय प्रिय तीं ॥२॥
एका जनार्दनीं चिंतन । तेणें जोडे नारायण । आणिक न लगे साधन । कलीमाजीं सर्वथा ॥३॥