करा रे बापानों साधन हरीचें । झणीं करणीचें करुं नका ॥१॥
जेणें नये जन्म यमाची यातन ऐसिया साधना करा कांही ॥२॥
साधनांचे सार मंत्रबीज हरि । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥३॥
कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरिनामा जपतां घडे ॥४॥
एका जनार्दनीं न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरुपा ॥५॥