गौळणीचा थाट निघाला मथुरे हातालागीं । तें देखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ॥१॥
कान्हयां सरसर परता नको आरुता येऊं । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ॥धृ॥
सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊं दे रे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरीं ॥२॥
आम्हीं बहुजनी येकला तु शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरीं ठेऊनी तुंतें जाऊं मथुरांपथें ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्मावादिनी गोपिका बरवटां । कृष्णापदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ॥४॥