श्रीगुरुकृपें दत्त वोळखिला । हृदय डोल्हार्यावरी बैसविला । अभेद पुर्ण चांदवा तेथें दिला । शुद्ध भक्तीनें दत्त पुजियेला ॥१॥
दत्तचरणीं मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी ॥धृ॥
सोहं गुढी तेथें उभारिली । मंत्र उपदेशें देहबुद्धी गेली । पुर्ण निवृत्ति प्रवृत्तिहि धाली । सहज पुर्णनंद पूर्णता जालीं ॥२॥
जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी । बोलावयाची राहिली शिराणी । जनीं वनीं एकात्मता खाणी । एका जनार्दनीं रंगलीसे वाणी ॥३॥