श्रीकृष्ण न्यावा गोकुळा । पायीं स्नेहाच्या शृंखळा । कायाकपटीं अर्गळा । मोहममतेच्या ॥१॥
कृष्णीं धरितां आवडी । स्वयें विराली स्नेहाची बेडी । मुक्तद्वारा परवडी । नाहीं अर्गळा शृखंळा ॥२॥
कृष्ण जंव नये होतां । तंवचि बंधनकथा । पावलीया कृष्णानाथा । बंदी मोक्ष ॥३॥
ते संधि रक्षणाईते । विसरली रक्षणातें । टकमकीत पहाते । स्वयें कृष्ण नेतां ॥४॥
श्रीकृष्ण अंगशोभा । नभत्व लोपलें नभा । दिशेची मोडली प्रभा । राखते कवण ॥५॥
अंधारामाजी सूर्य जातु । श्रीकृष्णासी असे नेतु । सत्व स्वभावें असे सांगतु । कृष्णाकडिये पडियेला ॥६॥
अंध ते बंधन नेलें । राखतो राखणे ठेलें । एका जनार्दनी केलें । नित्य मुक्त ॥७॥