उच्चार नामाचा करी पां साचार । आळस निर्धारें टाकून देई ॥१॥
तें नाम सोपें निवृत्तीचें जाणा । कायावाचा मना जप करीं ॥२॥
यातना तें कांही न पडे व्यसन । नाम उच्चारण निवृत्तीचें ॥३॥
निवृत्तिनामाचा लागलिया छंद । तुटे भवकंद नामें तोचि ॥४॥
एका जनार्दनीं निवृत्तिनाम धणी । गाईन मी वाणी सदोदित ॥५॥
साधन कासया श्रम ते करावे । निवृत्तिनाम गावें सदोदित ॥१॥
तीर्थयात्रा कांहीं नाम मुखें गाईं । निवृत्तिनामें डोहीं बुडी दे का ॥२॥
एका जनार्दनीं निवृत्ति नाम सार । करीं रे उच्चार वेळोवेळां ॥३॥
प्रपंच परमार्थ करीं कां रे सुखाचा । निरंतर वाचा निवृत्तिनाम ॥१॥
तुटेल बंधन खुंटेल पतन । निवृत्तिनाम जाण जपतांचि ॥२॥
योगयागादिक न लगे तीं साधनें । निवृत्तिनामें पेणें वैकुंठींचें ॥३॥
एका जनार्दनीं न करीं साधन । निवृत्ति म्हणतां जाण सर्व जोडे ॥४॥
माझ्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर निवृत्ति जपें ॥१॥
जपतां नामावळी आळस न करीं । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणें ॥२॥
सुखरुप तूं होसील साचार । गर्भाचा उदगार खुंटे साचा ॥३॥
एका जनार्दनीं सांगे निर्धार । निवृत्ति उच्चार नाम करी ॥४॥
सदोदित मना निवृत्तीचे पायीं । मना आणिक ठायीं जाऊं नको ॥१॥
जपतप काहीं न करीं साधन । तुटेल बंधन निवृत्तिनामें ॥२॥
तीर्थ व्रत चाड न धरीं अहंकार । नामाचा उच्चार निवृत्ति करी ॥३॥
तीर्थाचें हें तीर्थ निवृत्ति माहेर । एका जनार्दनीं निर्धार निवृत्तिपायीं ॥४॥
त्र्यंबक शिखरीं जीवन्मुक्त तुम्ही । नाथाचे ते धामीं गुप्तरुप ॥१॥
सर्वकाळ विठ्ठल विठ्ठल पैं वाचें । सार्थक देहाचें येणें करुनी ॥२॥
अखंड नामोच्चार समाधी सोहळा । आणिक न ये डोळां आड कांहीं ॥३॥
एका जनार्दनीं म्हणावा आपुला । आसनीं शयनीं त्याला विसरुं नका ॥४॥
श्रीज्ञानदेवांची स्तुती
विश्रांतीचें स्थान संतांचें माहेर । तें या भूमीवर अलंकापूर ॥१॥
तये स्थळीं माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनियां ॥२॥
सिध्देश्वर स्थान दरुशनें मुक्ती । ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर ॥३॥
चौर्यांयशी सिध्दांचा सिध्द भेटी मेळा । प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष ॥४॥
तयासी नित्यतां घडतां प्रदक्षणा । नाहीम पार पुण्या वास स्वर्गीं ॥५॥
अमृतमय वाहे पुढें इंद्रायणी । भागीरथी आदिकरुनि तीर्थराज ॥६॥
ऐशिया स्थळीं समाधी ज्ञानदेवा । एका जनार्दनीं ठाव अलंकापूर ॥७॥
नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा । निवृत्ति सहजा गुरुवर्या ॥१॥
नमो सोपानदेवा मुक्ताई परेशा । ठाव त्या सर्वेशा कर्हातटीं ॥२॥
समाधि वैभव पाहतां नयनीं । चुकतसे आयणी जन्मव्याधि ॥३॥
एका जनार्दनीं म्हणावा आपुला । अंकित अंकिला दास तुमचा ॥४॥
ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे । नाहीं कळिकाळाचें भेव जीवां ॥१॥
जातां अलंकापुर गांवीं । मोक्ष मुक्ति दावी वाट त्यासी ॥२॥
ब्रह्मज्ञान जोडोनी हात । म्हणे मी तुमचा अंकित ॥३॥
वाचे वदतां इंद्रायणी । यम वंदितो चरणीं ॥४॥
एका जनार्दनीं भावें । ज्ञानदेवा आठवावें ॥५॥
तुम्हांलागीं हरिहर । येती सत्वर अलंकापुरी ॥१॥
ऐशी थोरी तुमची देवा । न कळे अनुभवावांचूनि ॥२॥
माझे चित्त समाधान । जाहलें ध्यान धरितांचि ॥३॥
आठवी तुमचे गुण । जाहलें खंडन जन्ममृत्यु ॥४॥
वारंवार क्षणाक्षणा । माथा चरणां तुमचिया ॥५॥
भाकितों करुणा वचनीं । शरण एका जनार्दनीं ॥६॥
मोक्ष मुक्ति ऋध्दिसिध्दि । पाहतां समाधी ज्ञानदेवा ॥१॥
ऐसा लाभ सांगे देव । ऐके नामदेव आवडी ॥२॥
दरुशनें नासे व्याधी पीडा । ऐसा सवंगडा ज्ञानदेव ॥३॥
एका जनार्दनीं मापारी । नाचतसे अलंकापुरीं ॥४॥
जोडोनियां दोन्ही हात । जगीं जाणवितों मात ॥१॥
एकदा जा रे अलंकापुरा । जन्म वेरझारा चुकवा ॥२॥
आवडीं सांगा जीवींचें आर्त । माउली पुरविती जाणोनी ॥३॥
ज्ञानराज माझी माउली । एका जनार्दनाची साउली ॥४॥
जेथें न पुरे काळाचा हात । काय मात सांगूं त्याची ॥१॥
यमधर्म जोडोनी हात । उभेचि तिष्ठत द्वारेसी ॥२॥
ब्रह्मज्ञान लाळ घोटी । ऐशी कसवटी जयाची ॥३॥
शरण एका जनार्दनीं । लोळे ज्ञानदेवा चरणीं ॥४॥
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥
न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥
भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥
धन्य जाहलों आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
आजी देखिलीं पाउलें । सुख जाहलें समाधान ॥२॥
निवारला भाग शीण । पाहतां चरण गोमटे ॥३॥
भय निवारली खंती । दृष्टी मूर्ति पाहतां ॥४॥
समाधी सोहळा देखिला । एका जनार्दन सुखावला ॥५॥
कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ॥१॥
ज्ञानियाचा शिरोमणी । वंद्य जो का पूज्यस्थानीं । सकळांसी शिरोमणी । ज्ञानोबा माझा ॥२॥
चालविली जड भिंती । हारली चांग्याची भ्रांती । मोक्षमार्गाचा सांगाती । ज्ञानोबा माझा ॥३॥
रेड्यामुखीं वेद बोलविला । गर्व द्विजांचा हरविला । शांतिबिंब प्रगटला । ज्ञानोबा माझा ॥४॥
गुरुसेवेलागीं जाण । शरण एका जनार्दन । चैतन्याचें जीवन । ज्ञानोबा माझा ॥५॥
ज्ञानदेव चतुरक्षरीं जप हा करितु सर्वज्ञा । ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ।
ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्नीनें पापें जळती हें ज्याची आज्ञा ॥१॥
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतां ज्ञानदेव देतो । वासुदेव होतो अखंड वदनीं वदे तो ॥
ध्रु० ॥ नररुपें विष्णु अवतरला हा भगवान । नदी नद वापी कूप पाहतां उदक नव्हे भिन्न ।
नवल हेचि पशु ह्मौसा करितो वेदाध्ययन । नमन करुनी सद्वावें जपतां होय विज्ञान ॥२॥
देवाधीश देव भक्ताप्रती वर दे । देतां वर ब्रह्मांडा ब्रह्मा आनंद कोंदे ।
देशिकराज दयानिधि अलंकापुरीं जो नांदे । देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ॥३॥
वक्ता श्रोता श्रवणेंपठणें पावती समभाव । वर्णूं जातां अघटित महिमा होतो जीवशिव ।
वंदुनी अनन्य एका जनार्दनीं धरी दृढभाव । वर्षती निर्जर ज्ञानदेवनामें पुष्पांचा वर्षाव ॥४॥
ॐनमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥
तुमचा अनुग्रह लाधलों । पावन जालों चराचरीं ॥२॥
मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥
एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥
सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥
शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥
वेदशास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ॥३॥
ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
तुमचिया नामस्मरणीं । निशिदिनीं मति लागो ॥१॥
आठव तो मज द्यावा । दुजा हेवा मी नेंणें ॥२॥
वारंवार नाम कीर्ति । आठवीन श्रीपती दयाळा ॥३॥
एका जनार्दनाचा आपुला । पाहिजे सांभाळिला मायबापा ॥४॥
समाधि घेतली आळंदी । भोंवतीं शोभे सिध्द मांदी ॥१॥
सन्मुख पुढें अजानवृक्ष । देव येती तेथें साक्ष ॥२॥
कीर्तन गजरीं । नामघोष चराचरी ॥३॥
ऐसा सोहळा आनंद । एका जनार्दनीं नाहीं भेद ॥४॥
माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती ॥१॥
तुम्ही बैसोनि अंतरी । मज जागवा निर्धारीं ॥२॥
तुम्ही सत्ताधारी । प्रपंच करावा बाहेरी ॥३॥
श्रेष्ठा ज्ञानदेवा । एका जनार्दनीं आठवा ॥४॥
अहो दयाळे ज्ञानाबाईं । आर्त माझें तुझ्या पायीं ॥१॥
इंद्रायणीचे तटीं । ज्ञानाबाईं वो गोमटी ॥२॥
सकळ मेळा हो सिध्दांचा । ज्ञानाबाई अनुग्रहाचा ॥३॥
पूर्व पश्चिम देवस्थान । मध्यें ज्ञानाबाई आपण ॥४॥
ऐशी ज्ञानाबाई ध्याऊं । एका जनार्दनीं शरण जाऊं ॥५॥
श्रीज्ञानदेवें येउनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥१॥
दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥
अजानवृक्षाची मुळी कंठास लागली । येऊनि आनंद स्थळीं काढ वेगीं ॥३॥
ऐसें स्वप्न होतां आलों अलंकापुरीं । तंव नदीमाझारी देखिलें द्वार ॥४॥
एका जनार्दनीं पूर्वपुण्य फळलें । श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥
आदिनाथ शंकरे केला उपकार । ठेवणें निर्धार प्रगट केलें ॥१॥
तोचि महाराज निवृत्ति अवतार । केला उपकार जगालागीं ॥२॥
निवृत्तिने गुज सांगितलें ज्ञानदेवा । होतां जो ठेवा गुह्य कांहीं ॥३॥
ज्ञानदेव केले ठेवणें प्रगट । एका जनार्दनीं नीट मार्ग सोपा ॥४॥
पडलें मायावर्तीं शुध्दि नाहीं जया । म्हणोनि अवतार तयां धरणें लागे ॥१॥
धन्य गुरु माझा निवृत्ति दयाळ । दाखविले सोज्वळ पद जेणें ॥२॥
केला उपकार तारिले हे दीन । ज्ञानांज्ञानांजन घालूनियां ॥३॥
नेणती जाणती पडलीं जीं भुलीं । तयां शुध्दि केली त्रिअक्षरीं ॥४॥
एका जनार्दनीं त्रिभुवनीं प्रताप । उजळिला दीप ज्ञानदेवें ॥५॥
अवतार शिवाचा । निवृत्ति साचा जप करा ॥१॥
श्रीविष्णूचा अवतार । स्वामी माझा ज्ञानेश्वर ॥२॥
सोपानदेव तो निर्धार । ब्रह्मयाचा अवतार ॥३॥
मुक्ताईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
आणिक एक चमत्कार । जेव्हा उद्वस अलंकापूर । तेव्हां रंकांसी आदर । ज्ञानेश्वरें केला ॥१॥
वाणी होउनी आपण । प्रत्यक्ष मांडिलें दुकान । अन्न उदक तृप्त जाण । सर्वही केलें ॥२॥
ऐसें हे कौतुक । आश्चर्य मानती लोक । एका जनार्दनाचा रंक । चरणारविंदींचा ॥३॥
जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेउनी ॥१॥
पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥
ज्ञानदेवाच्या चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥
उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं मात जयाची ॥१॥
केला भगवदगीते अर्थ । ऐसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥
बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवातें उपदेशिती ॥३॥
एका जनार्दनीं समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥
संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥
अर्जुना संकट पडतां जडभारीं । गीता सांगे हरी कुरुक्षेत्रीं ॥२॥
तोचि अवतार धरी अलंकापुरी । ज्ञानाबाई सुंदरी तारावया ॥३॥
गीता शोधोनियां अर्थ तो काढिला । ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥
जगाचा उध्दार ज्ञानाबाई नामें । साधन हें आणिक नेणें न करीं कांहीं ॥५॥
एका जनार्दनीं ज्ञानाबाई नाम । पावेन निजधाम संतांचें तें ॥६॥
श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो दिवसरजनीं ॥१॥
केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥
पातकी दुर्जन हीन याती । चार अक्षरें तयां मुक्ती ॥३॥
संस्कृताची भाषा । मर्हाठी नि:शेष अर्थ केला ॥४॥
ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । अनुभव दावी भाविकां ॥५॥
एका जनार्दनीं अनुभव । समाधि ठावें अलंकापुरीं ॥६॥
भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥
स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥
तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥
एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥
श्रीसोपानदेवांची स्तुति
नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज ॥१॥
संवत्सर ग्राम कर्हातटीं उत्तम । पुण्यपावन नाम सोपान देव ॥२॥
जग तारावया हरिलीला केली । प्रसिध्द ती झाली सोपानदेवा ॥३॥
तुमचा प्रसाद द्यावा माझे हातीं । एका जनार्दनीं विनंती करीतसे ॥४॥
देव आणि भक्त करिती जयजयकार । नाम घोष अंबर गर्जतसे ॥१॥
आनंदे वैष्णव हरिकथा करिती । गाती नाचताती प्रेमछंदे ॥२॥
नारद तुंबर भक्त पुंडलिक । वैष्णव आणिक नाम गाती ॥३॥
सोपान आनंदे समाधि बैसला । एका जनार्दनीं केला जयजयकार ॥४॥
आनंद समाधि संत भक्त देव । करिती उत्साह संवत्सरीं ॥१॥
गरुड हनुमंत भक्त ते मिळाले । जयजयकार केलें सुरवरीं ॥२॥
पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी । सोपानदेवा भेटी येती देव ॥३॥
तो सुखसोहळा वर्णावया पार । नोहेचि निर्धार माझी मती ॥४॥
एका जनार्दनीं सोपानाचरणीं । मस्तक ठेवूनि निवांत राहीन ॥५॥
मन माझें लागो सोपानचरणीं । मस्तक हें धणी पायांवरी ॥१॥
सोपान सोपान जपेन हें नाम । अन्य न करीं नेम दुजा कांहीं ॥२॥
वारी पां सांकडें प्रपंच काबाड । घालूनियां आड नामशास्त्र ॥३॥
जीवींच्या जीवना माझिया सोपाना । एका जनार्दनी अभय द्यावें ॥४॥
सोपानदेव नाम पावन परम । आणिक उत्तम जप नाहीं ॥१॥
माझ्या मना तूं करी कां रे लाहो । सोपानदेव ध्यावो ह्रदयामाजीं ॥२॥
ब्रह्मा अवतार नाम हें सोपान । केलेंसे पावन चराचर ॥३॥
एका जनार्दनीं सोपानाच्या पायीं । ठेवितसे डोई काया वाचा ॥४॥
मति माझी लागो सोपनाचरणीं । रात्रंदिवस चिंतनी जप सदा ॥१॥
आणीक न करीं दुजा नेम धर्म । सर्व सोपें वर्मं सोपानदेवा ॥२॥
वेदशास्त्रें भांडती ज्यालागीं कोडें । ते असे उघडे संवत्सर ग्रामीं ॥३॥
प्रत्यक्ष विष्णुमूर्ति श्रीविठ्ठल देव । समाधीचा गौरव करीतसे ॥४॥
करुनी सोहळा समाधीं बैसविला । एका जनार्दनीं राहिला पुढें मागे ॥५॥
श्रीमुक्ताईची स्तुति
जगत्रय जननी मुक्ताबाई माते । कृपा करीं वरदहस्तें मजवरी ॥१॥
आदिनाथें अनुग्रह नाथासी दिधला । नाथें हस्त ठेविला मस्तकीं तुमच्या ॥२॥
बाळलीला केली जगीं ख्याती मिरविली । चांगयाची हरली चौसष्ट कळा ॥३॥
कळा पासष्टावी ज्ञानदेवें दाविली । चांगयाची विराली अहं ममता ॥४॥
चांगदेव शरण कायावाचामनें । एका जनार्दनीं म्हणे तैशापरी ॥५॥
योगियांचें ध्यान पैं विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी ॥१॥
नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥
अहं सोहं कोहं तुमचा प्रकार । वेदशास्त्र सार तुम्ही जाणां ॥३॥
अनुग्रह कृपेचा मजलागीं तो द्यावा । एका जनार्दनीं करावा कृपापात्र ॥४॥
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥१॥
जगाच्या उध्दारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढ जन ॥२॥
अज्ञानासी बोध सज्ञानाची शुध्दी । तोडिली उपाधी सर्वत्रांची ॥३॥
लडिवाळ तान्हें एका जनार्दनें । कृपा असो देणें मजवरी ॥४॥
नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हां ॥१॥
महाकल्पवरी चिरंजीव शरीर । कीर्ति चराचर त्रिभुवनीं ॥२॥
आनंदे समाधि सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडीं मुखोद्नत ॥३॥
एका जनार्दनीं तुमचें नाम गोड । त्रैलोकीं उघड नामकीर्ती ॥४॥
अजानवृक्षांची पानें जाण । जो भक्षून करील अनुष्ठान । त्यासी साध्य होईल ज्ञान । येथें संशय नाहीं ॥१॥
ज्ञानेश्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेकें । तो होय ज्ञानी अधिकें । येथें संशय नाहीं ॥२॥
मणिकर्णिका भागीरथी । इंद्रायणीचे स्नान करिती । ते मोक्षपदासी जाती । येथे संशय नाहीं ॥३॥
अश्वत्थ सिध्देश्वर । समाधीसी करी नमस्कार । तो पावे मोक्ष पैं सार । येथें संशय नाहीं ॥४॥
येथींचे वृक्षपाषाण । ते अवघे देव जाण । म्हणे एका जनार्दन । येथें संशय नाहीं ॥५॥
तीन अक्षरें निवृत्ति । जो जप करी अहोरात्रीं । तया सायुज्यता मुक्ती । ब्रह्मस्थिती सर्वकाळ ॥१॥
चार अक्षरें ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव । तया ब्रह्मपदीं ठाव । ऐसें शिवादिदेव बोलिले ॥२॥
सोपान हीं तीन अक्षरें । जो जप करील निर्धारें । तयास ब्रह्म साक्षात्कारें । होय सत्वर जाणिजे ॥३॥
मुक्ताबाई चतुर्विधा । जो जप करील सदा । तो जाईल मोक्षपदा । सायुज्य संपदा पावेल ॥४॥
ऐसीं हीं चौदा अक्षरें । जो ऐके कर्णविवरें । कीं उच्चारीं मुखद्वारें । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥५॥
एका जनार्दनीं प्रेम । जो जप करील धरील नेम । तयास पुन: नाहीं जन्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिले ॥६॥
गीतामाहात्म्य
गीतेचें महिमान ऐकावें श्रवणीं । सावधान सज्जनीं द्यावें आतां ॥१॥
जयाचे अंतरी वसे नित्य गीता । पावन तत्वतां ब्रह्मरुप ॥२॥
गीता म्हणतां ऐसें दोन्हीच अक्षरें । पाप तें निर्धारें दिशा लंघी ॥३॥
भगवदगीता पठण सर्वकाळ ज्यासी । मोक्षाची तो राशी मूर्तिमंत ॥४॥
गीता म्हणतां त्यासी काय पुण्य आहे । इतिहास पाहे पुराणींचा ॥५॥
पार्वतीयेप्रती शिवें सांगितलें । अध्यात्म बोलिले ब्रह्मविद्या ॥६॥’
ब्रह्मरुप त्याचें स्वयें चित्त झालें । बोलणें खुंटले आहे नाहीं ॥७॥
नित्य म्हणतां गीता वाचेसी स्मरण । केलिया पठण पुण्य काय ॥८॥
दोषाचे पर्वत भस्म होती तेणें । गीतेचे पठण केलियानें ॥९॥
श्रवण पठण गीतेचे पूजन । सर्वही साधन कलियुगीं ॥१०॥
पद्मपुराणीचें सांगितलें सार । गीता आहे थोर ब्रह्मविद्या ॥११॥
सर्वही पातकें जळोनियां जाती । अर्जुना श्रीपती बोलियेला ॥१२॥
गीता अभ्यासितां कळे सारासार । महिमा आहे थोर पठणाचा ॥१३॥
गीता म्हणतां आहे पापा प्रायश्चिता । मुक्ति सायुज्यता वरी त्यासी ॥१४॥
गीता म्हणतां जाण भागीरथीं स्नान । पृथ्वीचि दान दिधली तेणें ॥१५॥
गीता ध्याई नर सर्वदा तो सुची । सर्वही तीर्थांची महिमा तेथें ॥१६॥
तीर्थक्षेत्रयात्रा देवाचें पूजन । यज्ञयाग दान उद्यापन ॥१७॥
धरणी पारणी नित्य उपोषण । पृथ्वीचें भ्रमण निराहारी ॥१८॥
जप तप व्रत नित्य अनुष्ठान । कर्म आचरण उपासना ॥१९॥
पुराण श्रवण वेदशास्त्रीं जाण । सर्वही साधन घडे त्यासी ॥२०॥
ब्रह्मविद्या गीता सर्वांचें साधन । करी जो पठण नित्य काळीं ॥२१॥
एका जनार्दनीं नित्य हेंचि ध्यान । पूर्ण समाधान घडे तेणें ॥२२॥
वेदशास्त्र पुराणें अनेक शब्दज्ञानें । भारताचे श्रवणे सर्वस्व जोडे ॥१॥
ते सव्वालक्ष भारत जोडे पैं सुकृत । तेंचि गीते सात शतें प्राप्त होय ॥२॥
ऐशी भगवदगीता कृष्णार्जुन संवादतां । तेंचि फ़ळ लाभे वाचितां ऐक्यभावें ॥३॥
गीतीचें महा नेमें करा श्रवण पठण । ऐसें एका जनार्दन सांगतसे ॥४॥
गीतेचें आवर्तन त्यांचे ऐका पुण्य । सावध अंत:करण करुनियां ॥१॥
गीतेच्या सुकृता मौनावला विधाता । हरिहरां तत्वतां बोध जाला ॥२॥
वैकुंठापासूनि जाण तेणें बांधलें सदन । त्रिलोकीचें तीर्थाटन घडलें त्यासी ॥३॥
वाराणशी यात्रा तेणें केल्या अपारा । लक्षलक्षांतरा द्विजभोजनें ॥४॥
आणिक मेरुसमान वांटिलें सुवर्ण । कोट्यान कोटी पूजन साधूचें केलें ॥५॥
एका जनार्दनीं जाण इतुकें घडे महा पुण्य । हे सत्य सत्य वचन गीता आवर्तनीं ॥६॥
गीतेंचें सुव्रत । ज्यासी जालें प्राप्त । त्याचे पितर मुक्त । सहजचि जाले ॥१॥
नष्ट चांडाळ दुर्जन । परदारी तस्कर मात्रागमन । त्यासी गीता आवर्तन । श्रवणें मोक्ष होय ॥२॥
सुवर्णस्तेय सुरापान । भूत पिशाच्च राक्षसगण । मित्रद्रोही कृतघ्न । गीता आवर्तनें मोक्ष त्यासी ॥३॥
एका जनार्दनीं गीतार्थी । पठणें श्रवणें सर्वांसी मुक्ती । ऐसें पार्वतीप्रती । शंभु सांगे ॥४॥
गीता गीता वाचे जे म्हणती । नाहीं पुनरावृत्ति तया नरां ॥१॥
नित्य वाचे वदतां अक्षरें । भवसिंधु तरे अर्धक्षणीं ॥२॥
एका जनार्दनीं जयाचा हा नेम । तया पुरुषोत्तम न विसंबे ॥३॥
श्रीनामदेवचरित्र
पूर्वी हिरण्यकश्यपाचे कुळीं । नामा जन्मे भूमंडळीं ॥१॥
तेथें हरिभक्ति करी । तेणें तोषला नरहरी ॥२॥
घेउनी अवतार । राखी भक्तासी सादर ॥३॥
भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं शरणागत ॥४॥
पुढलीये जन्मीं नामा तो अंगद । भक्तिभावें तोषविला राम सदगद ॥१॥
परंपरा भक्ति हेचि असे भाक । देऊनियां देवें केलें कौतुक ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचे मनोरथ । स्वयें रमानाथ पुरवितसे ॥३॥
तिसरे अवतारीं नामा उध्दव जन्मला । करुनी कृष्ण दास्यत्व मान्य पैं जाहला ॥१॥
ज्ञान वैराग्य भक्ति कृष्ण सांगे तयासी । तेणें चुकविलें शापबंधासी ॥२॥
भागवत मथितार्थ स्वयें सांगे आपण । कृष्णावेगळा न जाय अर्धक्षण ॥३॥
यापरी दास्यत्व तेथें निकट केलें । एका जनार्दनीं म्हणे वंदूं त्यांचीं पाउलें ॥४॥
द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला ॥१॥
दामा आणि गोणाई नवसी विठूसी । पुत्र देईं आम्हां देवा भक्तराशी ॥२॥
तोचि नामदेव जन्म शिंपियाचे कुळीं । भक्तातें पाहुनी वेधला वनमाळी ॥३॥
एका जनार्दनीं परंपरा कथियेली । धन्य धन्य विठु अनाथाची माउली ॥४॥
पंच वरुषी नामा जाहला । छंद विठूचा लागला ॥१॥
जाऊनियां राउळांत । तेथें सावकाश बैसत ॥२॥
विठ्ठल हरि वाचे छंद । विठ्ठलें लाविलासे वेध ॥३॥
एका जनार्दनीं सार । मंत्र जपे त्रिअक्षर ॥४॥
ऐसे बहु दिन लोटले । दामा नामयासी बोले ॥१॥
जाउनी बैसशी राउळीं । सुखें सदा सर्वकाळीं ॥२॥
नाहीं प्रपंचाचा घोर । पुढें कैसा रे विचार ॥३॥
नको धरुं छंद मनीं । विनवी एका जनार्दनीं ॥४॥
विठुच्या छंदासी । पडतां आहे रे विवसी ॥१॥
संसाराची वाताहात । नामया होसी तूं निवांत ॥२॥
वडिलाची गोष्टी । नामा सांगे जगजेठी ॥३॥
एका जनार्दनीं वेधलें मन । ध्यानीं मनीं विठ्ठल पूर्ण ॥४॥
नावडे़चि आन । एका विठ्ठलावांचून ॥१॥
नावडे संसार सर्वथा । आवड बैसली पंढरीनाथा ॥२॥
नायके शिकविलें कोणाचें । विठ्ठल विठ्ठल साचें ॥३॥
एका जनार्दनीं मन । विठ्ठलीं लागलेसें ध्यान ॥४॥
दामा सांगे गोणाईसी । पोरें धरिलीसे विवसी ॥१॥
न पाहे संसाराचा छंद । मनीं धरिला तो गोविंद ॥२॥
एका जनार्दनीं सांगे । पुत्र जन्मोजन्मीं न फिटे पांग ॥३॥
उभयतां काकुलती येती । नाम्या नको करुं फजिती ॥१॥
आम्हां आलें वृध्दपण । कोण चालवी दुकान ॥२॥
व्यापाराचा नाहीं धाक । सुखें बैसशी तूं देख ॥३॥
अन्नवस्त्र नाहीं घरीं । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥
कां रे नाम्या नायकशी । म्हणोनी ताडित तयासी ॥१॥
नको जाऊं राउळास । म्हणोनी कोंडिती तयास ॥२॥
अन्न उदकाविण पीडिती । परी तो विठू ध्याय चित्तीं ॥३॥
मनीं करीतसे खेद । एका जनार्दनीं गोविंद ॥४॥
नामा न जातां राउळासी । विठु जातसे घरासी ॥१॥
अरे नाम्या म्हणोनि बाहे । शिव्या देती बापमाय ॥२॥
आमुच्या पोरासी सवे । येणें लावियेली पाहें ॥३॥
करुं नेदी संसारकाम । एका जनार्दनीं हा निष्काम ॥४॥
येणें आमुच्या पोरा लाविलासे चाळा । तो हा वेगळा उपाधीसी ॥१॥
प्रपंचाचा धाक नाहीं याचे मागें । फ़िरतसे अंगे घरोघरीं ॥२॥
घरीं कोंडोनियां ठेवितां नामयासी ।A आपण त्यापाशीं बैसतसे ॥३॥
जातो येतो कैसा न पडेचि दृष्टी । एका जनार्दनीं नाही विठु ऐसा ॥४॥
याचिया छंदा जें पैं लागलें । निर्मूलन केलें त्यांचे येणें ॥१॥
बापुडा नारदु लाविला लंगोटी । हिंडे दाटोदाटि त्रैलोक्यांत ॥२॥
हरिश्चंद्र शिबी कोण यांची गती । आपण निवांत चित्तीं पाहतसे ॥३॥
एका जनार्दनीं याचा छंद नाहीं बरा । मैंद खरा वाळुवंटीं ॥४॥
घालूनियां फ़ांसा वोढी आपणाकडे । न येतां सांकडें घाली बहु ॥१॥
भजातियाचे निवारी आघात आपण । न भजतिया अकल्याण करी स्वयें ॥२॥
ऐशी याची सवे मागाहुनी आली । एका जनार्दनीं बोली काय बोलों ॥३॥
याचिये संगतीं दु:खाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे ॥१॥
आम्ही प्रंपचीक करावा प्रंपच । हा तो निष्प्रपंच होउनी असे ॥२॥
येणें आमुच्या पोरा लावियेला चाळा । आपण निराळा राहुतसे ॥३॥
एका जनार्दनीं ऐशियाची माव । न येतां नामदेव कींव भाकी ॥४॥
म्हणे नामयासी क्षण एक न पाहातां । होय माझ्या चित्ता कासाविशी ॥१॥
तुमचा पुत्र तुम्हांसी जैसा प्रिय । तैसा मज होय नामदेव ॥२॥
क्षणोक्षणीं येणें पुरविली पाठी । लाविली लंगोटी आम्हांलागीं ॥३॥
एका जनार्दनीं वारितां नायके । येऊनियां सुखें बैसतो घरीं ॥४॥
शिव्या देतां यासी हांसतसे सुखें । न मानी कांहीं दु:खें नाम्यासाठीं ॥१॥
ऐसें येणें मोहिलें आमुचिया बाळा । हा कोठोनि काळा आला येथें ॥२॥
एका जनार्दनीं पुरविली पाठी । काय याची गोठी सांगावी ते ॥३॥
आम्ही यासी नवस केला । शेखीं कामा बराच आला ॥१॥
आम्ही पाहुं पुत्रसुख । हा तो दावितसे दु:ख ॥२॥
आमुचें जाईल दारिद्र्य जन्मांचें । ऐसें मनीं होतें साचें ॥३॥
एका जनार्दनीं कष्टी । येणें पुरविली पाठी ॥४॥
आमुचिया पोरा । नाहीं बैसावया थारा ॥१॥
ऐसा याचा पायगुण । न मिळे खावयासी अन्न ॥२॥
हाटा बाजारासी जातां । जाऊं नेदी पैं सर्वथा ॥३॥
माझा नामा कोठें आहे । नामा नामा म्हणोनी वाहे ॥४॥
एका जनार्दनीं सवे । येणें लावियेली देवें ॥५॥
उठोनियां बैसतां घरीं । नाम्या म्हणोनी हांक मारी ॥१॥
पाहो नेदी कांही धंदा । लावियेलें आपुल्या छंदा ॥२॥
हा तो जन्माचा भिकारी । सदा हिंडे दारोदारीं ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे । आपुल्यासारखें केलें येणें ॥४॥
येणें आमुचे पोरा लावियेला चाळा । आपण निराळा वेगळाची ॥१॥
याचें तो बिढार राउळींच असे । आम्हांसी कोपट नसे बैसावया ॥२॥
एका जनार्दनीं किती यासी बोलूं । नायके विठ्ठलु आमुचें तो ॥३॥
नाम्यासी सांगतां नायके विचार । येणें फ़जितखोर केला नामा ॥१॥
घेउनी जवळी बैसे एकान्तासी । सुचुं नेदी त्यासी कामधाम ॥२॥
शिकविलें नायके व्यापारा न जाये । धरले मनीं पाय विठोबाचे ॥३॥
एका जनार्दनीं यासी युक्ति काय । पुढे कार्य आहे नामयाचे ॥४॥
मी तो दरिद्री नाहीं जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आतां ॥१॥
या नामयाचें कैसें होईल लग्न । कोण देईल धन आम्हांलागी ॥२॥
आमुचा घराचार येणें बुडविला । पोर फ़ितविला काय करुं ॥३॥
या विठोबाचा येणें धरिलासे छंद । आमुचें जाहलें धिंद जगामाजीं ॥४॥
एका जनार्दनीं कोणा सांगूं गुज । कोण आहे मज जीवलग ॥५॥
कान्ता ही अबला नाहीं तिसी ज्ञान । माझें वृध्दपण जाहलें आतां ॥१॥
नवस करुनी हा मागितला नामा । संसार विश्राम होईल आम्हां ॥२॥
येणें तो मनीं धरिला विठ्ठल । याजकडे नाहीं बोल प्रारब्धेंचि ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा होय कष्टी । तो दामशेटी आपुले मनीं ॥४॥
रात्रंदिवस मनीं करीतसे चिंता । काय हे अनंता कर्म माझें ॥१॥
माझीया अदृष्टीं नाही पुत्रसुख । नित्त्यानित्य दु:ख आम्हालागीं ॥२॥
चालेना व्यापार मज न चले युक्ति । कैशी आतां गति नामयाची ॥३॥
येणे धरिला छंद विठ्ठलाचा मनीं । एका जनार्दनीं काय करुं ॥४॥
लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फ़जिती होय जगीं ॥१॥
सांगतां नायके नाहीं कोणाचा धाक । पंढरीनायक धरिला मनीं ॥२॥
एका जनार्दनीं ऐसें ऐकोनि दु:ख । मग तो नामा देख काय करी ॥३॥
येऊनी राउळा सांगे विठोबासी । वडील आम्हांसी गांजिताती ॥१॥
उदईक कापड घेऊनि बाजारासी जातों । परतोनि येतो सवेंचि घरा ॥२॥
व्यापार करावा तो कैसा मी नेणें । जन्मोनि पोसणें तुमचें देवा ॥३॥
आलें जें भोगांसी ते करणें लागे । एका जनार्दनीं सांगे गुज देवा ॥४॥
ऐकोनियां देव नाम्यासी बोलत । बाजार करुनि त्वरित येई वेगीं ॥१॥
तुज पाहिल्यावांचून मज नोहे समाधान । नाम्या तुझी आण वाहातसे ॥२॥
लौकरी नामया यावें परतोनी । ऐसें चक्रपाणी बोलतसे ॥३॥
एका जनार्दनीं ऐसें बोलोनि सर्वथा । नामा तो तत्त्वतां घरीं आला ॥४॥
त्रिवर्ग भोजना बैसले ते जाणा । गोणाई नाम्याकारण बोलतसे ॥१॥
नाम्या किती शिकवितां नायकसी बाळा । विठ्ठलाचा चाळा नको नाम्या ॥२॥
घेऊनि कापड जाईं बाजारासी । तेणें वडिलांसी समाधान ॥३॥
नामदेव म्हणे उदईक जाईन । एका जनार्दनीं आण वाहातसे ॥४॥
प्रात:काळ झाला । स्नान करुनि नामा आला ॥१॥
जाऊनियां राउळासी । घाली लोटांगण देवासी ॥२॥
जेवूनियां जातों बाजारा । त्वरित येईन माघारा ॥३॥
ऐसें बोलोनि नामा आला । एका जनार्दनीं जेवला ॥४॥
घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां ॥१॥
व्यापार तो कैंचा मज नाहीं ठावा । काय वो केशवा करुं आतां ॥२॥
माझी हे फ़जितीं होईल पांडुरंगा । काय या प्रसंगा करुं जातां ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा नामा कष्टी । होऊनी हिंपुटी चालिलासे ॥४॥
जाऊनियां माळीं नामा तो बैसला । व्यापार तो केला पाषाणाशीं ॥१॥
देऊनि कापड सुखें आला घरां । सर्व समाचारा विदित केलें ॥२॥
धोंडोबा गणोबा आले ते व्यापारी । तयांचे पदरीं कापड दिलें ॥३॥
आठ दिवसां ऐवज घेऊनियां जावा । एका जनार्दनीं पहावा हस्त त्याचा ॥४॥
आठ दिवसांची ऐवजाची बोली । आहे ते नेमिली नामा सांगे ॥१॥
सांगोनियां नामा राउळासी आला । वृत्तांत सांगितला विठोबासी ॥२॥
कापड विकिलें धोंडोबा गणोबासी । ऐवज आठवे दिवशीं आपुला घ्यावा ॥३॥
एका जनार्दनीं सर्वांचा तो आत्मा । सांगतांचि नामा देव हांसे ॥४॥
देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती ॥१॥
जाहले आठ दिवस जाईं तूं लौकरी । द्रव्य घेउनी झडकरी यावें मागें ॥२॥
वंदूनि श्रीविठ्ठला घरीं आला नामा । त्याला बोले दामा जाईं आधीं ॥३॥
एका जनार्दनीं आठ दिन जाहले । नाम्या जाय वहिलें ऐवज आणीं ॥४॥
येऊनी नामदेव बोले धोंडोबासी ऐवज आमुचा आम्हांसी द्यावा आतां ॥१॥
तुमचा तो करार जाहलासे संपूर्ण । ऐवज आमुचा जाण आम्हां द्यावा ॥२॥
परि तो प्रत्यक्ष धोंडोबा दगड । अचेतन मूढ जीव नाहीं ॥३॥
धोंडोबा गणोबा एके ठायीं केले । कांहीं तुम्ही वहिलें बोलानाची ॥४॥
एका जनार्दनीं घेउनी धोंडोबासी । आपुले घरासी नामा आला ॥५॥
आणुनी धोंडोबा कोंडियेला घरीं । मात सांगे हरिजवळी नामा ॥१॥
दामशेटी गेला आपुले कारणा । मागें आणिलें जाणा धोंडोबासी ॥२॥
देव म्हणे नाम्या बरें नाहीं केलें । एका जनार्दनीं बोले काय तेव्हां ॥३॥
धोंड्यासी व्यापार कोणी नाहीं केला । आज म्यां ऐकिला वृत्तांत तुझा ॥१॥
उभयतां ऐसी बोलती पैं गोष्टी । तंव दामशेटी घरीं आला ॥२॥
गोणाईनें सर्व सांगितलें त्यासी । पुत्र व्यापारासी उत्तम जाहला ॥३॥
एका जनार्दनीं ऐका त्याचा व्यापार । बुडविलें घर सर्व आपुलें ॥४॥
ऐवजानिमित्त धोंड्यासी आणिलें । कोंडोनी घातिलें घरामाजीं ॥१॥
ऐकतांचि दामा क्रोधयुक्त जाहला । पुसे गोणाईला नाम्या कोठें ॥२॥
बैसला जाउनी काळ्याचे शेजारीं । फ़जिती ती थोरी मांडिली तेणें ॥३॥
एका जनार्दनीं ऐकोनियां मात । दामा आला धांवत राउळासी ॥४॥
येवोनियां रागें नाम्यासी बोलत । व्यापार बहुत निका केला ॥१॥
चतुर व्यापारी जाहलासी सुजाण । आतां आम्हांकारण काय कमी ॥२॥
तुझिये व्यापारें भोपळा हा घ्यावा । भिकेसी बरवा उपाय असे ॥३॥
एका जनार्दनीं दामा बोले क्रोधें । नामा तो सद्वदे उत्तर देत ॥४॥
मालधनी घेउनी आलों असें घरा । तुम्ही कां दातार शिव्या देतां ॥१॥
द्रव्याचा मालक आणूनियां घरीं । ठेविला निर्धारीं काय भय ॥२॥
चलावें घरासी घ्यावी द्रव्यरासी । न देतां गणोबासी घेउन येतों ॥३॥
एका जनार्दनीं दामा पुढें आला । नामा विठोबाला कींव भाकी ॥४॥
जन्मांचा पोसणा तुझा मी पामर । काय आतां विचार केशिराजा ॥१॥
घरासी पैं जातां ताडतील मज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥
म्हणे नाम्या न करीं काहीं चिंता । एका जनार्दनीं सर्वथा नुपेक्षी देव ॥३॥
नाम्या झडकरी जाई तूं घरासी । चिंता ती मानसीं करुं नको ॥१॥
तुझा छंद आहे माझिये मानसीं । तूं वेगीं घरासी जाय आतां ॥२॥
एका जनार्दनीं वंदुनी चरण । नामा आला जाण घरालागीं ॥३॥
दामशेटी म्हणे ऐवजाचा धनी । आणिला तो मजलागुनी दावी आतां ॥१॥
वंदुनी चरण म्हणे चला आंत । जगीं हें प्रख्यात करुं नका ॥२॥
एका जनार्दनीं बोलोनियां मात । धरियेला हात वडिलांचा ॥३॥
जाऊनियां आंत धोंड्यासी दाविलें । सुवर्ण तें जाहलें अंतर्बाह्य ॥१॥
तुमचें तें द्रव्य मोजूनियां घ्यावें । उरलें तें धाडावें गणोबासी ॥२॥
एका जनार्दनीं पाहूनियां दामा । आलिंगिला नामा सद्रदित ॥३॥
नामयासी बोलतसे दामशेटी । कोणाचे कर्णी गोठी सागूं नको ॥१॥
आपणांसी देवें द्रव्य हें दिधलें । तूं कां म्हणसी वहिलें द्यावें तया ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचा महिमा । वाढविणें पुरुषोत्तमा आपुलें काजा ॥३॥
आपुल्या काजासाठी । धावें भक्ताचिये पाठीं ॥१॥
ऐसा कृपाळू उदार । विटे उभा कटीं कर ॥२॥
एका जनार्दनीं शरण । भक्ताचे मनोरथ पुरती जाण ॥३॥
नाम्याचें कारण देवें नवल केले । धोंडोबाचे जाहलें सुवर्ण तें ॥१॥
गोणाई दामशेटीतें आनंद पैं जाहला । म्हणती भला भला नामा आमुचा ॥२॥
न कळे लाघव देवाचें सर्वथा । म्हणती नामा आमुचा कर्ता जाहला आतां ॥३॥
एका जनार्दनीं द्रव्याचिया आशा । विसरले सर्वेशा पांडुरंगा ॥४॥
घरचा वृत्तांत पाहुनी नयनीं । नामा तेचि क्षणीं राउळीं गेला ॥१॥
पायांवर भाळ ठेवुनी तत्वतां । म्हणे पंढरीनाथ सांभाळिलें ॥२॥
जन्माचा पोसणा दास तुझा दीन । तें त्वां वचन सत्य केलें ॥३॥
एका जनार्दनीं दासाचें धांवणें । देवाविण कोण करील तें ॥४॥
मायबाप माझा सोयरा जिवलग । तूंचि पांडूरंग मजलागी ॥१॥
माझियाकारणें पुरविलें धन । केलें माझें संरक्षण मायबाप ॥२॥
म्हणोनियां डोई ठेवियेली पायीं । प्रेमभरित पाहीं नामा जाहला ॥३॥
एका जनार्दनीं देवाचा एकुलता । नामयापरता कोणी नाहीं ॥४॥