वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग १५०१ ते १५३१

संत एकनाथ अभंग १५०१ ते १५३१

अभंग १५०१

संत कृपाळुं उदार

संत कृपाळुं उदार । ब्रह्मादिकां न कळे पार ॥१॥
काय वानूं मी पामर । थकले सहा अठरा चार ॥२॥
नेति नेति शब्दें । श्रुति विरालिये आनंदें ॥३॥
एका जनार्दनीं शरण । धरा माझी आठवण ॥४॥

अभंग १५०२

स्वर्ग जयाची पायरी

स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्यांचा आज्ञाधारीं ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । पायवणी ये शिवब्रह्मा ॥२॥
ब्रह्माज्ञानाची ती मात । कोण तया तेथें पुसत ॥३॥
भुक्ति मुक्ति लोटांगणी शरण एका जनार्दनीं ॥४॥

अभंग १५०३

मोक्षमुक्ति काकुलती

मोक्षमुक्ति काकुलती । संतांप्रती येताती ॥१॥
करा माझा अंगिकार । नाहीं थार तुम्हांवीण ॥२॥
हेंचि द्यावें आम्हांलागुनी । तुमचें चरणीं वास सदा ॥३॥
एका जनार्दनीं करी विनंती । कींव भकिती संतांप्रती ॥४॥

अभंग १५०४

घालितां संतापायीं मिठी

घालितां संतापायीं मिठी । पुर्वज वैकुंठी उद्धरती ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । वानुं न शके शिवब्रह्मा ॥२॥
इच्छिलें तें फळ । जन पावती सकळ ॥३॥
एका जनार्दनीं विश्वास । संत दासांचा मी दास ॥४॥

अभंग १५०५

संतचरणींचा महिमा

संतचरणींचा महिमा । कांहीं न कळें आगमां निगमां ॥१॥
ब्रह्मा घाले लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥२॥
शिव ध्यातो पायवणी । धन्य धन्य संतजनीं ॥३॥
तया संतांचा सांगात । एका जनार्दन निवांत ॥४॥

अभंग १५०६

संतसंगत घडे

संतसंगत घडे । सायुज्यता जोडे ॥१॥
मुक्ति लागती चरणीं । ब्रह्माज्ञान लोटांगणीं ॥२॥
एका जनार्दनीं सांगात । घडतां होय देहातीत ॥३॥

अभंग १५०७

पहातां संतसमुदाय

पहातां संतसमुदाय । भुक्ति मुक्ति तेथें देव ॥१॥
जातां लोटांगणीं भावें । ब्रह्माज्ञान अंगं पावें ॥२॥
तयाचे उच्छिष्टाचा कण । शरण एका जनार्दन ॥३॥

अभंग १५०८

संतदरुशनें लाभ होय

संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव ॥१॥
पुराणीं महिमा सांगें व्यास । संतदया सर्वांस सारखी ॥२॥
यातिकुळ हो कां भलतें । करिती सरते सर्वांसी ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संतमहिमान वेगळें ॥४॥

अभंग १५०९

जें सुख संतसज्जनाचे पायीं

जें सुख संतसज्जनाचे पायीं । तें सुख नाहीं आणिके ठायी ॥१॥
तुकितां या सुखाचेनी तुके । पैं वैकुंठ जाले फिकें ॥२॥
पाहोंजातां लोकीं तिहीं । ऐसें न देखें आणिकें ठायीं ॥३॥
नवल या सुखाची गोडी । हरिहर ब्रह्मा घालिती उडी ॥४॥
क्षीरसागर सांडोनी पाही । अंगें धांवे शेषशाई ॥५॥
एका जनार्दनीं जाली भेटीं । सुख संतोषा पडली मिठी ॥६॥

अभंग १५१०

सुख अपार संतसंगीं

सुख अपार संतसंगीं । दुजें अंगीं न दिसे कोठे ॥१॥
बहु सुख बहुता परी । येथेंची सई नसेची ॥२॥
स्त्रिया पुत्र धन सुख । नाशिवंत देख शेवटीं ॥३॥
एका जनार्दनीं संतसुखा । नोहे लेखा ब्रह्मांडी ॥४॥

अभंग १५११

संतसुखा नाहीं पार

संतसुखा नाहीं पार । तेणें आनंद पैं थोर ॥१॥
ऐशी सुखाची वसती । सनकादिक जया गाती ॥२॥
सुखें सुख अनुभव । सुखें नाचतसे देव ॥३॥
तया सुखाची वसती । एका जनार्दनीं ध्यातसे चिंत्तीं ॥४॥

अभंग १५१२

अमृता उणें आणिता संतजन

अमृता उणें आणिता संतजन । नाम अमृत खूण पाजिताती ॥१॥
नाशिवंत यासी अमृत उपकार । अनाशिवंता नामामृतसार ॥२॥
नाशिवंत देह नाशिवंत जीव । नाशिवंत ठाव जगडंबर ॥३॥
एका जनार्दनीं संताचिये दृष्टी । नाशिवंत सृष्टी सजीव होती ॥४॥

अभंग १५१३

संत ते सोयरे जिवलग सांगाती

संत ते सोयरे जिवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व काम ॥१॥
कामधेनु कल्पतरु चिंतामणी । उदार चुडामणी याहुनी संत ॥२॥
देऊं परिसाची यासी उपमा । परी ते अये समा संताचिये ॥३॥
एका जनार्दनीं संतांचा सांगात । पुरती सर्व आर्त जीवींचें जें ॥४॥

अभंग १५१४

जे या नेले संता शरण

जे या नेले संता शरण । जन्ममरण चुकलें त्या ॥१॥
मागां बहुतां अनुभव आला । पुढेंहि देखिला प्रत्यक्ष ॥२॥
महापापी मूढ जन । जाहले पावन दरुशनें ॥३॥
एका जनार्दनीं संत । कॄपावंत दयाळू ॥४॥

अभंग १५१५

मागें संतीं उपकार

मागें संतीं उपकार । केला फार न वर्णवें ॥१॥
पाप ताप दैन्य गेलें । सिद्धची जाहले सर्वमार्ग ॥२॥
दुणा थाव आला पोटीं । संतभेटी होतांची ॥३॥
शरण एका जनार्दनीं । पावन जनीं संत ते ॥४॥

अभंग १५१६

संतांचा उपकार

संतांचा उपकार । सांगावया नाहीं पार ॥१॥
आपणासारिखें करिती । यातिकुळ नाहीं चित्तीं ।२॥
दया अंतरांत वसे । दुजेपणा तेथें नसे ॥३॥
उदारपणें उदार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥

अभंग १५१७

भाग्यवंत संत होती

भाग्यवंत संत होती । दीन पतीत तारिती ॥१॥
नाहीं तया भाग्या पार । काय पामर मी बहूं ॥२॥
चुकविता जन्म जरा । संसारा यापासोनी ॥३॥
एका जनार्दनीं शरण । पतीतपावन संत तें ॥४॥

अभंग १५१८

भाग्यवंत होती संत

भाग्यवंत होती संत । दीन पतीत तारिती ॥१॥
उपदेश विठ्ठल मंत्र । देती सर्वत्र सारिखा ॥२॥
स्त्रिया शुद्र अथवा बाळें । कृपा कल्लोळे एकचि ॥३॥
एका जनार्दनीं शरण । पतीतपावन संत होती ॥४॥

अभंग १५१९

संतांचे संगती

संतांचे संगती । पाप नुरे तें कल्पांती ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥
तीर्थ व्रत जप दान । अवघें टाका वोवाळुन ॥३॥
संतचरणींचे रजःकण । वंदी एका जनार्दन ॥४॥

अभंग १५२०

संतचरणीचें रजःकण

संतचरणीचें रजःकण । तेणें तिन्हीं देव पावन ॥१॥
ऐसा महिमा ज्याची थोरी । वेद गर्जें परोपरी ॥२॥
शास्त्रें पुराणें सांगत । दरुशनें प्राणी होती मुक्त ॥३॥
शरण एका जनार्दनीं । ठाव द्यावा संतचरणीं ॥४॥

अभंग १५२१

संतचरणीं आलिंगन

संतचरणीं आलिंगन । ब्रह्माज्ञानी होती पावन ॥१॥
इतर सहज उद्धरती । वाचे गातां ज्यांची कीर्ति ॥२॥
लाभे लाभ संतचरणीं । मोक्षसुख वंदी पायवणीं ॥३॥
शरण एका जनार्दनीं । उदार संत त्रिभुवनीं ॥४॥

अभंग १५२२

संताचें चरण ध्यातां

संताचें चरण ध्यातां । हारपली जन्मव्यथा ॥१॥
पुढती मरणाचें पेणें । चुकती जन्मजरा तेणें ॥२॥
संतसमुदाय दृष्टी । पडतां लाभ होय कोटी ॥३॥
शरण एका जनार्दनीं । काया कुर्वडीं संतचरणीं ॥४॥

अभंग १५२३

संतांच्या दरुशनें

संतांच्या दरुशनें । तुटे जन्ममरण पेणें ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । बोलतां नाहीं वो उपमा ॥२॥
तीर्थ पर्वकाळ यज्ञ दान । संतचरणीं होती पावन ॥३॥
शरण एका जनार्दनीं । संत पावन इये जनीं ॥४॥

अभंग १५२४

अपार महिमा संतांचा

अपार महिमा संतांचा । काय बोलुं मी वाचा ॥१॥
मागें तरले पुढें तरती । जदजीवा उद्धरती ॥२॥
नाममात्रा रसायन । देउनी तारिती संतजन ॥३॥
ऐशा संतां शरण जाऊं । एका जनार्दनीं ध्याऊं ॥४॥

अभंग १५२५

संत दयाळ दयाळ

संत दयाळ दयाळ । अंतरीं होताती प्रेमळ ॥१॥
शरण आलियासी पाठीं । पहाताती कृपादृष्टी ॥२॥
देउनियां रसायना । तारिताती भवार्णव जाणा ॥३॥
संतांसी शरण जावें । एका जनार्दनीं त्यांसी गावें ॥४॥

अभंग १५२६

संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ

संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ । पातकी नष्ट तारिती ॥१॥
ऐसा आहे अनुभव । पुराणीं पहाहो निर्वाहो ॥२॥
वेद शास्त्र देती ग्वाही । संत श्रेष्ठा सर्वा ठायीं ॥३॥
एका जनार्दनीं संत । ब्रह्मादिकां न कळे अंत ॥४॥

अभंग १५२७

धन्य धन्य जगीं संत

धन्य धन्य जगीं संत । कृपावंत दीनबंधु ॥१॥
कृपादृष्टी अवलोकितां । परिपुर्ण समदृष्टी ॥२॥
अगाधा देणेंऐसें आहे । कल्पातीं हें न सरेची ॥३॥
एका जनार्दनींचित्त । जडो हेत त्या ठायीं ॥४॥

अभंग १५२८

तुटती बंधनें संतांच्या दारुशनें

तुटती बंधनें संतांच्या दारुशनें । केलें तें पावन जगीं बहु ॥१॥
महा पापराशी तारिलें अपार । न कळे त्यांचा पार वेदशास्त्रां ॥२॥
वाल्मिकादि दोषी तारिलें अनुग्रही । पाप तेथें नाहीं संत जेथें ॥३॥
पापताप दैन्य गेलें देशांतरीं । एका जनार्दनीं निर्धारी सत्य सत्य ॥४॥

अभंग १५२९

उदापरणें संत भले

उदापरणें संत भले । पापीं उद्धरिलें तात्काळ ॥१॥
ऐसे भावें येतां शरण । देणें पेणें वैकुंठ ॥२॥
ऐसें उदार त्रिभुवनीं । संतावांचुनीं कोण दुजें ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संत पतीतपावन ॥४॥

अभंग १५३०

पतीतपावन केलें असें संतीं

पतीतपावन केलें असें संतीं । पुराणीं ती ख्याती वर्णियेली ॥१॥
सदोषी अदोषी तारिलें अपार । हाचि बडिवार धन्य जगीं ॥२॥
नाना वर्ण याती उत्तम चांडाळ । उद्धरिलें सकळ नाममात्रें ॥३॥
एका जनार्दनीं दयेचें सागर । संतकृपा धीर समुद्र ते ॥४॥

तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref: transliteral

संत एकनाथ अभंग १३२४ते१५३० संत एकनाथ अभंग १३२४ते१५३० संत एकनाथ अभंग १३२४ते१५३०
अभंग १५३१

मेघापरिस उदार संत

मेघापरिस उदार संत । मनोगत पुरविती ॥१॥
आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥२॥
लिगाड उपाधी तोडिती । सरते करिती आपणामाजीं ॥३॥
काळाचा तो चुकवितो घाव । येउं न देती ठाव आंगासी ॥४॥
शरण एका जनार्दनीं । तारिले जनीं मूढ सर्व ॥५॥