वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग १४०१ ते १५००

संत एकनाथ अभंग १४०१ ते १५००

अभंग १४०१

अंतरशुद्धीचें कारण

अंतरशुद्धीचें कारण । वाचे करा हरिकीर्तन ॥१॥
देवा आवडी कैसी । धेनु धांवे वत्सा जैसी ॥२॥
कीर्तनीं तारिला गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥
किर्तनीं तारिली गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥
ऐशी कीर्तनाची गोडी । एका जनार्दनीं घाली उडी ॥५॥

अभंग १४०२

करितां कीर्तन श्रवण

करितां कीर्तन श्रवण । अतर्मलाचें होत क्षालन ॥१॥
तुमचें कीर्तन पवित्र कथा । पावन होत श्रोता वक्ता ॥२॥
तुमचे कीर्तनीं आनंद । गातां तारले ध्रुव प्रल्हाद ॥३॥
कीर्तनाचा गजर होतां । यम काळ पळे सर्वथा ॥४॥
एका जनार्दनीं कीर्तन । तिन्हीं देव वंदिती चरण ॥५॥

अभंग १४०३

कीर्तनीं स्वधर्म वाढे

कीर्तनीं स्वधर्म वाढे । कीर्तनीं जोडे चित्तशुद्धी ॥१॥
ऐसा महिमा कीर्तनाचा । शुक सांगे परिक्षिती साचा ॥२॥
होती पावन अधम जन । करितां कीर्तन कलियुगीं ॥३॥
एका त्याचा दासानुदास । जाती कीर्तनास आवडी जे ॥४॥

अभंग १४०४

हरिकीर्तनें चित्त शुद्ध

हरिकीर्तनें चित्त शुद्ध । जाय भेद निरसुनीं ॥१॥
कामक्रोध पळती दुरी । होत भोंवरी महापापा ॥२॥
गजरें हरिचें कीर्तन । पशु पक्षी होती पावन ॥३॥
स्त्री पुरुष अधिकार । कीर्तन सार कलियुगीं ॥४॥
एका जनार्दनीं उपाय । तरावया भवनदीसी ॥५॥

अभंग १४०५

तरले तरती भरंवसा

तरले तरती भरंवसा । कीर्तनमहिमा हा ऐसा ॥१॥
म्हनोनियां हरीचे दास । कीर्तन करिती सावकाश ॥२॥
एका जनार्दनीं कीर्तन । आनंदें होती तें पावन ॥३॥

अभंग १४०६

धन्य धन्य तें शरीर

धन्य धन्य तें शरीर । जेथें कथा निरंतर ॥१॥
गुण गाती भगवंतांचे । तेचि जाणावें दैवाचे ॥२॥
स्वयें बोलिले जगज्जीवन । थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥
एका जनार्दनीं भले । हरिभक्तीनें उद्धरीले ॥४॥

अभंग १४०७

कीर्तनाचें थोर सुख

कीर्तनाचें थोर सुख । यदुनायक राहे उभा ॥१॥
भाळे भोळे घेती नाम । करिती आराम कीर्तन ॥२॥
नाना साधनांचे वोढी । न लगे सांकडी सोसाव्या ॥३॥
एका जनार्दनीं सोपें बहू । कीर्तनीं पाहे देवातें ॥४॥

अभंग १४०८

धन्य भाग्याचे जन इहलोकीं

धन्य भाग्याचे जन इहलोकीं । कीर्तनें जाले सुखी कृतकृत्य ॥१॥
पातकी घातकी यासी सोपा पंथ । कीर्तन तरती कलीमाजी ॥२॥
योगयोग व्रत तप कल्पकोडी । कीर्तन श्रवण गोडी तेथें नाहीं ॥३॥
वेदशास्त्र पुराण श्रुतीचें आनुमोदन । करा रे कीर्तन कलीमाजीं ॥४॥
एका जनार्दनीं आल्हादें कीर्तन । करितां श्रोते वक्तें जाण पावन होती ॥५॥

अभंग १४०९

तुमचें चरित्र श्रवण

तुमचें चरित्र श्रवण । आवडी करुं तें कीर्तन ॥१॥
संसार पुसोनियां वाव । निजपद देशी ठाव ॥२॥
स्वभावें कीर्तन करितां । एवढा लाभ ये हातां ॥३॥
एका जनार्दनीं कीर्तनं । होती पातकी पावन ॥४॥

अभंग १४१०

आवडी करितां हरिकीर्तन

आवडी करितां हरिकीर्तन । हृदयीं प्रगटे जनार्दन ॥१॥
थोर कीर्तनाचें सुख । स्वयें तिष्ठेक आपण देख ॥२॥
घात आलिया निवारी । चक्र गदा घेउनी करीं ॥३॥
कीर्तनीं होऊनी सादर । एका जनार्दनीं तत्पर ॥४॥

अभंग १४११

जेथें सर्वदा कीर्तनघोष

जेथें सर्वदा कीर्तनघोष । जाती दोष पळुनी ॥१॥
यमधर्म संगे दूता । तुम्ही सर्वथा जाऊं नका ॥२॥
जेथे स्वयें हरि उभा । कोण शोभा तुमची ॥३॥
तुम्ही रहावें उभे पुढें । आलें कोडें निवारावें ॥४॥
एका जनार्दनीं कीर्तन । श्रेष्ठ सर्वाहुनी जाण ॥५॥

अभंग १४१२

कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि

कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि । कीर्तनें निरसे आधिव्याधी ॥१॥
कीर्तनें काया कीर्तनें माया । कीर्तनें सर्व एक ठाया ॥२॥
द्वंद्व द्वैत भेद नुरेची ठाव । कीर्तनीं तिष्ठें उभाचि देव ॥३॥
निद्रेमाजीं वोसणें देवो । म्हणें मज ठावो कीर्तनीं ॥४॥
एका जनार्दनीं कीर्तनासाठी । देव धावें भक्तापाठीं ॥५॥

अभंग १४१३

जुनाट कीर्तनमहिमा

जुनाट कीर्तनमहिमा । तया काय देऊं उपमा ॥१॥
धन्य धन्य हरीचे दास । करिती आस कीर्तनीं ॥२॥
मागें तरले पुढें तरती । पहा प्रचीती पुराणीं ॥३॥
म्हणोनि एका काकुलतीं । कीर्तन करा दिनराती ॥४॥

अभंग १४१४

परपंरा कीर्तन चाली

परपंरा कीर्तन चाली । मागुन आली अनिवार ॥१॥
उद्धवा सांगे जनार्दन । कीर्तन पावन कलीमाजीं ॥२॥
अर्जुना तोचि उपदेश । कीर्तन उद्देश सर्वथा ॥३॥
एका जनार्दनीं तत्पर । कीर्तन करावें निरंतर ॥४॥

अभंग १४१५

काळाचे तो न चले बळ

काळाचे तो न चले बळ । करितां कल्लोळ कीर्तनीं ॥१॥
शिव सांगे गिरजेप्रती । कीर्तनीं प्रीति धरावीं ॥२॥
सांगे शुक परिक्षिती । कीर्तनीं उद्धार पावती ॥३॥
एका अनन्य त्यांचा दास । धरतीं आस कीर्तनीं जे ॥४॥

अभंग १४१६

कीर्तनानंद चारी मुक्ती

कीर्तनानंद चारी मुक्ती । धांवत येती घरासी ॥१॥
सोपें सार सोपें सार । कीर्तन उच्चार कलीयुगीं ॥२॥
वाहतां टाळीं कीर्तनछंदें । जाती वृंदे पातक ॥३॥
एका विनटला कीर्तनीं । भुक्तिमुक्ति लागतीं चरणीं ॥४॥

अभंग १४१७

कीर्तनासाठी चारी मुक्ती

कीर्तनासाठी चारी मुक्ती । उभ्या राबती हरिदासां ॥१॥
कलीयुगीं हेंचि सार । करावें साचार कीर्तन ॥२॥
कृता त्रेता द्वापारीं । कीर्तनमहिमा परोपरी ॥३॥
एका तयांसी शरण । कीर्तन करितीं अनुदिन ॥४॥

अभंग १४१८

वेदाचिया मतें विसरुनि कीर्तन

वेदाचिया मतें विसरुनि कीर्तन । करती जे पठण शीण त्यांसी ॥१॥
वेदाचा अर्थ न कळेची पाठका । कीर्तनीं नेटका भाव सोपा ॥२॥
श्रुतीचेनी मतें पाहे तो उच्चार । परी सारासारविचार कीर्तनीं ॥३॥
एका जनार्दनीं पुराणाच्या गोष्टी । कीर्तन वाक्पुटीं करा सुखें ॥४॥

अभंग १४१९

नेणें वेदशास्त्र पुराण पठण

नेणें वेदशास्त्र पुराण पठण । तेणें नामकिर्तन करावें ॥१॥
कलीमाजीं सोपा मार्ग । तरावया जग उत्तम हें ॥२॥
नोहे यज्ञ यागयोग व्रत । करावें व्रत एकादशी ॥३॥
एका जनार्दनीं सार । वाचे उच्चार हरिनाम ॥४॥

अभंग १४२०

एक कीर्तन करितां पंढरीसी

एक कीर्तन करितां पंढरीसी । सुकृताच्या राशी ब्रह्मा नेणें ॥१॥
संतसमागम टाळ घोळ नाद । ऐकतां गोविंद सुख पावे ॥२॥
जनार्दनाचा एक करी विनवणी । मस्तक चरणीं ठेवितसे ॥३॥

अभंग १४२१

योगी शिणती साधनीं

योगी शिणती साधनीं । पावन होती ते कीर्तनीं ॥१॥
अष्टांग धूम्रपान । तया श्रेष्ठ हें साधन ॥२॥
समाधी उन्मनी । कीर्तनीं पावन हे दोनी ॥३॥
चौदेहांसी अतीत । कीर्तनीं होतीं तें मुक्त ॥४॥
कर्म धर्म न लगे श्रम । व्यर्थ वाउगा विश्रांम ॥५॥
कीर्तन छंद निशिदिनीं । एका शरण जनार्दनीं ॥६॥

अभंग १४२२

ऐसी कीर्तनाची आवडी

ऐसी कीर्तनाची आवडी । प्रायश्चित्तें जाली देशधडी ॥१॥
होती तीर्थें तीं बापुडीं । मळ रोकडी टाकिती ॥२॥
ऐकोनी कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकीचा व्यापार ॥३॥
यमपाश टाकिती खालीं । देखोनि कीर्तनाची चालीं ॥४॥
ऐसा कीर्तनसोहळा । एका जनार्दनीं देखे डोळीं ॥५॥

अभंग १४२३

येती कीर्तना आल्हादें

येती कीर्तना आल्हादें । गाती नाचती परमानंदे । सुखाची तीं दोंदें । आनंदें तयासी ॥१॥
धन्य धन्य कीर्तन । धन्य धन्य संतजन । जाले कीर्तनीं पावन । परमानंदगजरीं ॥२॥
हरि कृष्ण गोविंद । हाचि तया नित्य छंद । तेणें जाय भेदाभेद । कीर्तनगजरीं ॥३॥
एका जनार्दनीं सार । कीर्तनीं केलासे निर्धार । आणिक नाहीं दुजा विचार । कीर्तनावांचोनी ॥४॥

अभंग १४२४

कीर्तन ते पूजा कीर्तन तें भक्ति

कीर्तन ते पूजा कीर्तन तें भक्ति । कीर्तनें होय मुक्ति सर्व जीवां ॥१॥
पातकी चांडाळ असोत भलते । कीर्तनीं सरते कलियुगी ॥२॥
कीर्तन श्रवण मनन पठण । कीर्तनें पावन तिन्हीं लोक ॥३॥
एका जनार्दनीं कीर्तनीं आवडी । घालीतसे उडी वैकुंठाहुनी ॥४॥

अभंग १४२५

करितां भगवद्भक्ती

करितां भगवद्भक्ती । चारी मुक्ति पायां लागती ॥१॥
ऐसा लाभ नाहीं कोठें । कीर्तनामाजीं देव भेटे ॥२॥
योगयाग तप साधन । कासया तें ब्रह्माज्ञान ॥३॥
न लगे तीर्थाचें भ्रमण । सदा ध्यान नारायण ॥४॥
एका जनार्दनीं भक्ति । तेणें पावे उत्तम गती ॥५॥

अभंग १४२६

सेवितां कथासार अमृत

सेवितां कथासार अमृत । तेणें गोड जाले भक्त ॥१॥
मातले मरणातें मारिती । धाके पळती यमदुत ॥२॥
प्रेमें नाचे कथामेळीं । सुखकल्लोळीं हरिनाम ॥३॥
गर्जती नाम सदा वाचे । एका जनार्दनी तेथें नाचे ॥४॥

अभंग १४२७

कीर्तनीं आवडी जया नरा देखा

कीर्तनीं आवडी जया नरा देखा । चुकतीस खेपा जन्माकोटी ॥१॥
कीर्तनीं समाधीं कीर्तनीं समाधी । पुढें आधीव्याधी कीर्तनेची ॥२॥
कीर्तनें बोध कीर्तनें सिद्धी । एका जनार्दनीं गोविंदीं कीर्तनीं ऐक्य ॥३॥

अभंग १४२८

पुरुष अथवा नारी

पुरुष अथवा नारी । नाचती कीर्तन गजरीं ॥१॥
तया कोनी जें हासती । त्यांचें पूर्वज नरका जाती ॥२॥
आपुली आपण । कीर्तनीं सोडवण ॥३॥
देहीं असोनी विदेहता । कीर्तनीं होय पैं तत्त्वतां ॥४॥
ऐसा कीर्तनमहिमा । एका जनार्दनीं उपमा ॥५॥

अभंग १४२९

सर्वभावे जे झाले उदास

सर्वभावे जे झाले उदास । धरुनियां आस कीर्तनीं ॥१॥
सर्व काळ सर्व वाचे । सर्व साचें कीर्तन ॥२॥
सर्वां देहीं सर्व वेदेहीं । सर्वां वदवीं कीर्तन ॥३॥
सर्व मनीं सर्व ध्यानीं । सर्वां ठिकाणीं कीर्तन ॥४॥
सर्व देशीं सर्व गांवीं । एका भावीं कीर्तन ॥५॥

अभंग १४३०

ऐशी शांती जयासी देखा

ऐशी शांती जयासी देखा । तोचि सर्व भुतांचा सखा ॥१॥
सर्व लोकीं आवडता । जाला सरता कीर्तनीं ॥२॥
सर्व लोकीं आवडता । जाला ठायीं देखें देवो ॥३॥
सर्व दृष्टीचा देखणा । शरण एका जनार्दना ॥४॥

अभंग १४३१

हेंचि कलीमाजीं साधन

हेंचि कलीमाजीं साधन । आवडी कीर्तन हरीचें ॥१॥
न घडे योगयागतप । होय अनुताप कीर्तनीं ॥२॥
भावभक्ति लागे हातीं । प्रेम धरिती कीर्तनीं ॥३॥
आवडी धरा हरिकीर्तनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥

अभंग १४३२

नरदेहा येउनी करावें कीर्तन

नरदेहा येउनी करावें कीर्तन । वाचे नामस्मरण विठ्ठलाचें ॥१॥
आणिक सायास न करी आळस । सर्वकळ सोस हाचि वाहे ॥२॥
घटिका आणि पळ न वेंची वायां । नामस्मरणीं काया झिणवावी ॥३॥
प्रपंच परमार्थ करी का रें सारखा । संसार पारखा करुनी सांडी ॥४॥
माईक हें धन इष्टमित्र सखे । अंतकाळीं पारखे अवघे चोर ॥५॥
एका जनार्दनीं न धरी भरंवसा । कोण यमपाशा चुकवील ॥६॥

अभंग १४३३

देह लावी हरिकीर्तनीं

देह लावी हरिकीर्तनीं । येर कारणीं पडुं नको ॥१॥
सोडी संसाराचा छंद । कीर्तनीं गोविंद आठवा ॥२॥
होई दास संतचरंणीं । पायवणी वंदी तूं ॥३॥
काया लावी देवाकडे । येर सांकडें वारिल ॥४॥
अनुमोदन सर्वाठायीं । मन देई हरिचरणीं ॥५॥
म्हणे जनार्दनाचा एका । काया वाचा भाविका सांगत ॥६॥

अभंग १४३४

नरदेह उत्तम चांग

नरदेह उत्तम चांग । धरा लाग कीर्तनीं ॥१॥
वायां जाऊं नेदी घडी । करा जोडी कीर्तन ॥२॥
क्षणभंगुर हा देहो । करा लाहो कीर्तनीं ॥३॥
संसार अवघा नासे । खरें दिसे कीर्तन ॥४॥
म्हणे जनार्दनीं एका । उपाय निका कीर्तन ॥५॥

अभंग १४३५

शुद्ध ज्याचें मन

शुद्ध ज्याचें मन । तया आवडे कीर्तन ॥१॥
येर ते पामर पातकी । दैन्यवाणें तिहीं लोकीं ॥२॥
नावडे हरीचें कीर्तन । तेथें वसे नाना विघ्र ॥३॥
एका शरण जनार्दनीं । करा कीर्तन अनुदिनीं ॥४॥

अभंग १४३६

भुललें ते प्राणी विसरले कीर्तना

भुललें ते प्राणी विसरले कीर्तना । अंतीं त्या पतना वारी कोण ॥१॥
जयांसी नावडे हरींचें किर्तन । ते जाणावे पाषाण कलीमाजीं ॥२॥
मागें सांगितलें संतीं अनुभवुनी । तयावया जनीं किर्तन नौका ॥३॥
एका जनार्दनीं सारांचें हें सार । कीर्तने भवपार मॄत्युलोकीं ॥४॥

अभंग १४३७

करुनी हरिकीर्तन

करुनी हरिकीर्तन । तेथें सेविती जे अन्न ॥१॥
ऐसे अभागी खळ । परम चांडाळ कलीयुगीं ॥२॥
हरिकथा माउली । विकिताती अर्थभुली ॥३॥
पंच महापातक । तया घडे दोष देख ॥४॥
एका जनार्दनीं । करा कीर्तन अनुदिनीं ॥५॥

अभंग १४३८

करुनी कीर्तन मागती जे द्रव्य

करुनी कीर्तन मागती जे द्रव्य । तें जाणावें वैधव्य विधवेचें ॥१॥
सर्व अलंकार शरीर शोभलें । वायांपरी गेलें कुंकुहीन ॥२॥
मावनानें भावें करावें कीर्तन । आनंदे वर्तन वैष्णवांपुढें ॥३॥
एका जनार्दनीं कामनीक कीर्तन । करितां पतन जन्मोजन्मीं ॥४॥

अभंग १४३९

वाउगा पसारा नेणें तो पामर

वाउगा पसारा नेणें तो पामर । कीर्तनीं निर्धार ठेवीचिना ॥१॥
सोपें हें वर्म कीर्तन हरीचें । उच्चारी रे वाचे रामनाम ॥२॥
एका जनार्दनीं कीर्तन आदरें । सर्वभावें निर्धारें श्रवण करी ॥३॥

अभंग १४४०

जो जो काळ वेंचिता कीर्तनीं

जो जो काळ वेंचिता कीर्तनीं । तों तों सार्थक जनेकें होतसे ॥१॥
साधन जागा साधन जागा । पुढें दगा चुकवी ॥२॥
करी कीर्तनीं तूं वेग । तेणें संग तुटेल ॥३॥
म्हणे जनार्दनाचा एका । उपाय सोपा कलीमाजीं ॥४॥

अभंग १४४१

सप्रेम नाचोनि वाजवा टाळी

सप्रेम नाचोनि वाजवा टाळी । गर्जा हरिकथा नामावळी ॥१॥
ऐशी कथेची आवडी । दोष गेले देशोधडी ॥२॥
सेवितां कथामृतसार । दीनवदनें दिसे संसार ॥३॥
एका जनार्दनीं प्रेम । स्वयें सांगें पुरुषोत्तम ॥४॥

अभंग १४४२

दीन म्हणोनी नाच रे कीर्तनीं

दीन म्हणोनी नाच रे कीर्तनीं । तेणें चक्रपाणी करी कृपा ॥१॥
अनाथाचा नाथ पतीतपावन । म्हणोनी कीर्तन तया गोडी ॥२॥
एका जनार्दनीं गोडाचें तें गोड । कीर्तन सुरवाड तिहीं लोकीं ॥३॥

अभंग १४४३

अपाय उपाय न टाकी कीर्तन

अपाय उपाय न टाकी कीर्तन । सदा सर्वकाळ ध्यान रामकृष्ण ॥१॥
तयाचिये घरीं वसे नारायण । लक्ष्मी सह आपण कार्य करी ॥२॥
एका जनार्दनीं कीर्तनासाठीं । देव धांवें पाठीं त्या मागें ॥३॥

अभंग १४४४

नसे वैकुंठी हरी

नसे वैकुंठी हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी । पाठी धांवे तयाच्या ॥१॥
म्हणोनी करावें कीर्तन । तेणें तुष्टें नारायण । मनोरथ करी पुर्ण । इच्छिलें ते सर्वदा ॥२॥
आणा अनुभव मनीं । करा कीर्तन अनुदिनीं । एका जनार्दनीं । उभा असे कीर्तनीं ॥३॥

अभंग १४४५

साधन नको आणिक कांहीं

साधन नको आणिक कांहीं । करी लवलाही कीर्तन ॥१॥
मोक्ष मुक्ती ठाके पुढें । येर अवघें तें बापुडें ॥२॥
भक्ति साधे नवरत्न । कीर्तनें होती ते पावन ॥३॥
एका जनार्दनीं कीर्तन । ओहं सोहं कोहं जाती पळुन ॥४॥

अभंग १४४६

समाधीचें स्थान हरिकीर्तन

समाधीचें स्थान हरिकीर्तन । येर अवघा वांयां शीण ।
कासया गुदाग्रीं अंगुष्ठ लाऊन । खटाटोप पसारा ॥१॥
राम कृष्णा हरि वासुदेवा । हाचि छंद असो जीवा ॥धृ॥
आसन ध्यान मुद्रा लक्षण । कर्मकांड क्रिया धर्म जाण ।
वाउगें कासया भस्मलेपन । कीर्तन अंतरीं नसेची ॥२॥
माळा मुद्रा शृंगार भारी । भाळे भोळे भोदीं निरंतरीं ।
ऐशी कीर्तनमर्यादा नाहीं निर्धारीं । निरपेक्ष हरिकीर्तन ॥३॥
श्रोता वक्ता होउनी सावधान । परनिंदा परपीडा टाकून ।
कीर्तन करावें श्रवण । रामकृष्ण नामें उच्चार ॥४॥
ऐसं ऐकतां कीर्तन । समाधीसी तेथें समाधान ।
अष्टांगादि कर जोडोनि । उभें सर्वदा राहाती ॥५॥
कीर्तनें होय सर्व सिद्धी । तुटती भवपाश आधिव्याधी ।
एका जनार्दनीं नाहीं उपाधी । कीर्तनी श्रवण केलिया ॥६॥

अभंग १४४७

जें पदींनिरुपण तेंचि हृदयीं ध्यान

जें पदींनिरुपण तेंचि हृदयीं ध्यान । तेथें सहजीं स्थिर राहे मन ।
कीर्तनासी तोषोनि कळिकाळ तुष्टला । समाधीसी समाधान रे ॥१॥
कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि । कीर्तनें समाधान बुद्धी ।
कीर्तनीं विनटले नारद प्रल्हाद । द्वंद्वामाजीं समाधी रे ॥२॥
कीर्त्नीं सद्भाव अखंड अहर्निशीं । पाप नरिघे त्याच्या देशीं ।
निजनामे निष्पाप अंतर देखोनीं देव तिष्ठे तयापशीं रे ॥३॥
हरिनम कीर्तनें अभिमान सरे । आणिक श्रेष्ठ आहे काज ।
सद्भावें कीर्तनीं गातां पैं नाचतां । लोकेषणा सांडीं लाज रे ॥४॥
कलीमाजी कीर्तन श्रेष्ठ पैं साधन । साच अन मानी ज्यांचें मन ।
नामासी विन्मुख जन्म त्यसी दुःख । त्या केविं होय समाधान रे ॥५॥
कीर्तानाचेनि पंथें लाजविलीं तीर्थें । जप तपासे केले मुक्त ।
हरिनामे लोधला देवाधि देवो । वैकुंठचि केलें तेथें रे ॥६॥
व्रतां तपां तीर्थों न भेटे जो पाहतां । तो कीर्तनीं सांपडे देवो ।
तनु मन प्राणें कीर्तनीं विनटले । भावा विकला वासुदेवो रे ॥७॥
एका जनार्दनीं कीर्तन भावें । श्रोता वक्ता ऐसें लाहावें ।
गर्जत नामें निशाण लागुनि । सकळिकां वैकुंठासी जावें रे ॥८॥

अभंग १४४८

सदैव आवडे ज्यां कीर्तन

सदैव आवडे ज्यां कीर्तन । धन्य पावन जगीं ते ॥१॥
ब्रह्माचारी गृहस्थाश्रमीं । करिती कीर्तन निजधामीं ॥२॥
शुद्र अथवा अति निंद्य । कीर्तनीं वंद्य सर्वथा ॥३॥
यवन मांतगादि जन । कीर्तनीं पावन कलियुगीं ॥४॥
एका शरण जीवेंभावें । सदा कीर्तन करावें ॥५॥

अभंग १४४९

दुजेंपणें पाहे तरी देवाचे चरण

दुजेंपणें पाहे तरी देवाचे चरण । आणि तें कीर्तन वैष्णवांचें ॥१॥
कीर्तनीं नाचती हरिदास प्रेमें । दुजेपणा नेमें हारुनी जाय ॥२॥
एका जनार्दनीं दुजेपणा टाकुणी । वासुदेवचरणीं लीन होई ॥३॥

अभंग १४५०

कायावाचामनें निग्रह करीं

कायावाचामनें निग्रह करीं । कीर्तन सर्व भावे ऐकें निर्धारीं । अष्टांग साधन न करी । सुखें करी कीर्तन ॥१॥
देव तुष्टेल तुष्टेल । सर्वभाव तुझा पुरवेल ॥ध्रु॥
शांती क्षमा दया उन्मनी । आशा मनीषा तृष्णा दवडोनी । काम क्रोध मद लोभ बंदीखानी । घालीं नेउनी निर्धारें ॥२॥
सर्वांभुतीं समदृष्टी । पाहे सर्व एकमय सृष्टी । तरी ऐक्य कीर्तनगोठीं । परमानंदें आल्हाद ॥३॥
धरी संतांचा सांगात । कीर्तनीं करीं शुद्ध चित्त । एका जनार्दनीं वचनार्थ । राम हरि गोविंदा ॥४॥

अभंग १४५१

पाहूं गेलिये हरि जागरा

पाहूं गेलिये हरि जागरा । नयन लांचावले नंदकुमारा ॥१॥
तान्हया रे मनमोहना । देहगेहाची तुटली वासना ॥२॥
आदरें आवडी ऐकतां नाम । नाममात्रें जालों निष्काम ॥३॥
एका जनार्दनीं हरिकीर्तन । समाधीसी तेथें समाधान ॥४॥

अभंग १४५२

नसे वैकुंठीं अणुमात्र

नसे वैकुंठीं अणुमात्र । नाचतां पवित्र कीर्तनीं ॥१॥
त्याचा छंद माझे मनीं । अनुदिनीं कीर्तन ॥२॥
नेणें कांहीं दुजें आतां । कीर्तनापरता छंद नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं वेध । कीर्तन छंद गोड देखा ॥४॥

अभंग १४५३

आणिक तें आम्हां न दिसे प्रमाण

आणिक तें आम्हां न दिसे प्रमाण । कीर्तनावांचून आनु नेणों ॥१॥
राम कृष्ण हरि विठ्ठल उच्चार । करुं हा गजर वाहुं टाळी ॥२॥
आनंदे नामावळी गाऊं पैं कीर्तनीं । श्रुतीं टाळ घोळ लाऊनी गजरेंसी ॥३॥
एका जनार्दनीं हाचि आम्हां छंदा । वाऊगा तो ढंग न करुं कांहीं ॥४॥

अभंग १४५४

आमुच्या स्वहिता आम्हीं जागूं

आमुच्या स्वहिता आम्हीं जागूं । वाउग्यां न लागूं मार्गासी ॥१॥
करुं पुजन संतसेवा । हेंचि देवा आवडतें ॥२॥
तुळसीमाळा घालुं गळां । मस्तकीं टिळा चंदन ॥३॥
मुद्रा अलंकार भूषण । करुं कीर्तन दिननिशीं ॥४॥
एका जनार्दनीं न सेवूं आन । वाहूं आण देवाची ॥५॥

अभंग १४५५

मागणें तें आम्हीं मागूं देवा

मागणें तें आम्हीं मागूं देवा । देई हेवा कीर्तनीं ॥१॥
दुजा हेत नाहीं मनीं । कीर्तनावांचुनी तुमचीया ॥२॥
प्रेमें हरिदास नाचत । कीर्तन होत गजरीं ॥३॥
एका जनार्दनीं कीर्तन । पावन होती चराचर जाण ॥४॥

अभंग १४५६

धन्य धन्य कीर्तन जगीं

धन्य धन्य कीर्तन जगीं । संत तेची सभागीं ॥१॥
गाती कीर्तनीं उल्हास । सदा प्रेमें हरिदास ॥२॥
नाहीं आणिक चिंतन । करती आदरें कीर्तन ॥३॥
एका जनार्दनीं शरण । जालों कीर्तनीं पावन ॥४॥

अभंग १४५७

नेणों कळायुक्ती व्युप्तत्ती सर्वथा

नेणों कळायुक्ती व्युप्तत्ती सर्वथा । करुं हरिकथा नाम गाऊं ॥१॥
कलियुगामाजीं साधन वरिष्ठ । श्रेष्ठांचे तें श्रेष्ठ नाम जपुं ॥२॥
हाचि अनुभव बहुतांसी आला । म्हणोनि वर्णिला नाममहिमा ॥३॥
एका जनार्दनीं नामयज्ञ कथा । पावन सर्वथा जड मूढा ॥४॥

अभंग १४५८

एकचि नाम वाचे

एकचि नाम वाचे । श्रीरामाचें सर्वकाळ ॥१॥
पर्वत उल्लंघी पापाचे । नाम वाचे वदतांची ॥२॥
आवडी करितां कीर्तन । नासे भवाचें बंधन ॥३॥
श्रेष्ठ साधन कीर्तन । तेणें तोषें जनार्दन ॥४॥
एका जनार्दन कीर्तन । मना होय समाधान ॥५॥

अभंग १४५९

वसो कां भलते ठायीं जन

वसो कां भलते ठायीं जन । परि कीर्तन करी हरीचें ॥१॥
तोचि सर्वांमध्यें वरिष्ठ । एकनिष्ठपणें होतां कीर्तनीं ॥२॥
मनीं वसो सदा कीर्तन । अहर्निशीं ध्यान कीर्तनीं ॥३॥
पावन तो तिहीं लोकीं । एका अवलोकीं तयातें ॥४॥

अभंग १४६०

या हो या चला जाऊं कीर्तना

या हो या चला जाऊं कीर्तना । आनंद तेणें मना नाचती वैष्णव ॥१॥
राम कृष्ण हरि वासुदेवा । गातती प्रेमभाव आवडी आदरें ॥२॥
सुख तेथें शांती विरक्ति कोण पुसे । सबाह्म अभ्यंतरीं अवघा वासुदेव वसे ॥३॥
एका जनार्दनीं वासुदेवीं मन । जन वन तेथें अवघा जनार्दन ॥४॥

अभंग १४६१

नवल भजनाचा भावो

नवल भजनाचा भावो । स्वतां भक्तांची होय देवो ॥१॥
वाचे करिती हरिकीर्तन । उन्मनी मन निशिदिनीं ॥२॥
नाहीं प्रपंचाचें भान । वाचे सदा नारायण ॥३॥
एका जनार्दनीं मुक्त । सबाह्म अभ्यंतरीं पतीत ॥४॥

अभंग १४६२

तान मान सर्वथा

तान मान सर्वथा । तें भजन न मने चित्ता ॥१॥
वेडेंवाकुडें तुमचे नाम । गाइन सदोदित प्रेम ॥२॥
वाचा करुनी सोंवळी । उच्चारीन नामावळी ॥३॥
नाम तारक हें जनीं । व्यास बोलिले पुराणीं ॥४॥
एका जनार्दनीं जप । सुलभ आम्हां विठ्ठल नाम देख ॥५॥

अभंग १४६३

ऐसें सुख कोठें आहे

ऐसें सुख कोठें आहे । भजन सोडोनि करिशी काय ॥१॥
सोंडोनि भजनाचा प्रेमा । मुक्ति मागसी अधमा ॥२॥
सांडोनियां संतसंग । काय मुक्ति ते अभंग ॥३॥
एका जनार्दनीं मुक्ति । भजन केलिया दासी होती ॥४॥

अभंग १४६४

वाहूनिया हातीं टाळी

वाहूनिया हातीं टाळी । करुं भजन प्रेमळीं ॥१॥
विठ्ठल विठ्ठल वाचे वदूं । दुजा नाहीं आम्हां छंदु ॥२॥
जाऊं पंढरीस नेमें । संतासंगें अनुक्रमें ॥३॥
पुंडलीक चंद्रभागा । दरुशनें जाय पापभंगा ॥४॥
एका जनार्दनीं स्नान । पातकें पळती रानोरान ॥५॥

अभंग १४६५

भजन भावें गाऊं भजन भावें ध्याऊं

भजन भावें गाऊं भजन भावें ध्याऊं । भजन भावें पाहूं विठोबासी ॥१॥
भजन तें सोपें भजन तें सोपें । हरतील पापें जन्मांतरींची ॥२॥
घालूं तुळशीमाळा गोपीचंदन लल्लाटीं । देखतां हिंपुटी यम पळे ॥३॥
सांडूंनियां आशा जालों वारकरी । एका जनार्दनीं पंढरी पाहूं डोळा ॥४॥

अभंग १४६६

भजन भावातें उपजवी

भजन भावातें उपजवी । देव भक्तांतें निपजवी ॥१॥
ऐसा भजनेंचि देव केला । भक्त वडिल देव धाकुला ॥२॥
भक्ताकारणे हां संकल्प । भक्त देवाचाहि बाप ॥३॥
देव भक्ताचीये पोटीं । जाला म्हणोनी आवड मोठी ॥४॥
एका जनार्दनीं नवलावो । भक्ताचि कैसा जाला देवो ॥५॥

अभंग १४६७

जीव परमात्मा दोन्ही

जीव परमात्मा दोन्ही । ऐसे जाणती तेचि ज्ञानी ॥१॥
ऐसं असोनि संपन्न । सदा करिती माझे भजन ॥२॥
माझ्या भजना हातीं । उसंतु नाहीं दिवसराती ॥३॥
जन नोहें जनार्दन । एका जनार्दनीं लोटांगण ॥४॥

अभंग १४६८

हरिभजनीं घेतां गोडीं

हरिभजनीं घेतां गोडीं । निवारे जन्ममरण कोडी ॥१॥
भावें करितां हरीचें भजन । देवा होय समाधान ॥२॥
हरिभजनाची आवडी । काळ केला देशोधडी ॥३॥
एका जनार्दनीं भजन । भजनीं पावे समाधान ॥४॥

अभंग १४६९

हरिभजनीं घेतां गोडी

हरिभजनीं घेतां गोडी । निवारे जन्ममरण कोडी ॥१॥
भावें करितां हरीचें भजन । देवा होय समाधान ॥२॥
हरिभजनाची आवडी । काळ केला देशोधडी ॥३॥
एका जनार्दनीं भजन । भजनीं पावे समाधान ॥४॥

अभंग १४७०

काया वाचा आणि मन

काया वाचा आणि मन । एक करुनी करी भजन ॥१॥
हाचि मुख्य भजनभावो । सांडीं भेद अभेदाचा ठावो ॥२॥
मना धरुनियां शांती । प्रेमें भजें कमळापती ॥३॥
एका जनार्दनीं भजन । तेणें पावसी समाधान ॥४॥

अभंग १४७१

नवल रोग पडिपाडु

नवल रोग पडिपाडु । गोड परमार्थ झाला कडु ॥१॥
विषय व्याधीचा उफाडा । हरिकथेचा घ्यावा काढा ॥२॥
ऐसा रोग देखोनि गाढा । एका जनार्दनीं धांवे पुढा ॥३॥

अभंग १४७२

नित्य हरिकथा वैष्णव सांगात

नित्य हरिकथा वैष्णव सांगात । तोचि परमार्थ शुद्ध त्याचा ॥१॥
नाहीं कधीं द्वैत सदा तें अद्वैत । अभेदरहित सर्वकाळक ॥२॥
परमार्थसाधनीं झिजवितसें अंग । वाउगा उद्योग न करी कांहीं ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा ज्याचा हेत । त्याचे मनोरथ पूर्ण होती ॥४॥

अभंग १४७३

करी हरिकथा टाकी दंभमान

करी हरिकथा टाकी दंभमान । वायंचि पतन पडूं नको ॥१॥
नामाचा विश्वास संतांचा सांगात । तेणें तुझें हित सर्व होय ॥२॥
द्रव्य दारा यांचा मानी पा विटाळ । सर्वां ठायीं निर्मळ होसी बापा ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा धरी मार्ग । सोपा संसर्ग पूर्वजांसी ॥४॥

अभंग १४७४

धरितां श्रीहरींचें ध्यान

धरितां श्रीहरींचें ध्यान । समाधीस समाधान ॥१॥
तो सोपा आम्हांलागी । उघडा पहा धन्य जगीं ॥२॥
कीर्तनीं नाचतो भक्तामागें । मन वेधिलें या श्रीरंगें ॥३॥
एका जनार्दनीं सुखाची भेटी । झालिया होय जन्ममरण तुटी ॥४॥

अभंग १४७५

चरणीं ठेउनि माथा संतांसी पूजावें

चरणीं ठेउनि माथा संतांसी पूजावें । उगेंचि ऐकावें हरिकीर्तन ॥१॥
कलीमाजीं श्रेष्ठ कलीमाजी श्रेष्ठ । कीर्तन बोभाटें पळतीं दोष ॥२॥
न लगे नाना युक्ती व्युप्तत्तीचें वर्म । हरीचें कीर्तन सोपें बहु ॥३॥
योगयागादिक नोहें यथासांग । तेणें होय भंग सर्व कर्मां ॥४॥
एका जनार्दनीं धरुनि विश्वास । जाई तूं संतांस शरण सुखें ॥५॥

अभंग १४७६

गाजी परमानंदु मानसीं

गाजी परमानंदु मानसीं । संत भेटतां सुखराशी । कीर्तनें तारिलें सर्वांसी । विठ्ठल नामस्मरणें ॥१॥
धन्य धन्य विठ्ठल मंत्र । सोपा तीन अक्षरीं पवित्र । काळिकाळ उघडोनि नेत्र । पाहूं न शके जयासी ॥२॥
एका जनार्दनीं उघडोनि नेत्र । पाहुं न कीर्तनें प्राप्त सर्व स्थिती । जयजय रामकृष्ण म्हणती । ते तरती कालीमाजीं ॥३॥

अभंग १४७७

नित्य नवा कीर्तनीं कैसा वोढवला रंग

नित्य नवा कीर्तनीं कैसा वोढवला रंग । श्रोता आणि वक्ता स्वयें जाला श्रीरंग ॥१॥
आल्हादें वैष्णव करती नामाचा घोष । हरिनाम गर्जतां गगनीं न माये हरुष ॥२॥
पदोपदीं कीर्तनीं निवताहे जन मन । आवडी भुकेली तिनें गिळिलें गगन ॥३॥
एका जनार्दनीं गातां हरीचें नाम । निमाली इंद्रियें विषय विसरली काम ॥४॥

संतमहिमा
अभंग १४७८

उद्धवा स्वमुखें सांगे श्रीकृष्ण

उद्धवा स्वमुखें सांगे श्रीकृष्ण । संतसेवा जाण सर्वश्रेष्ठ ॥१॥
हाची योग जाण उद्धवा स्वीकारी । आणिक न करी भरोवरी साधन उद्धवा ॥२॥
योगयाग तप वत कसवटी । न करी आन गोष्टीरे उद्धवा ॥३॥
कीर्तन भजन सर्वभावें करी । जाई संतद्वारी शरणागत रे उद्धवा ॥४॥
मनींचे निजगुज सांगितलें तुज । एका जनार्दनीं निज साधे रे उद्धवा ॥५॥

अभंग १४७९

ऐका रे उद्धवा तुज सांगतों गुज

ऐका रे उद्धवा तुज सांगतों गुज । संतचरणरज वंदीं तु सहज ।
तेणें कार्य कारण होईल तुज । अंतरदृष्टी करुनी परीस निज ॥१॥
घाली लोटांगण वंदी चरण । कायावाचामनें धरुनी जीवीं ॥धृ०॥
आलीया संतजन आलिंगन देई । पुजा ती बरवी समर्पावी ।
ज्ञान ध्यान त्याचें करावें जीवीं । हेतु सर्व भावी मनीं धरी उद्धवा ॥२॥
कायिक वाचिक मानसिक भाव । अपीं तेथें जीव देहभाव ।
एक जनार्दनीं तयांचें वैभव । सांगितलें तुज उद्धवा ॥३॥

अभंग १४८०

उद्धवा तूं धर संतसमागम

उद्धवा तूं धर संतसमागम । तेणें भवश्रम हरे उद्धवा ॥१॥
सांगासे गुज मना धरीरें उद्धवा । आणिक श्रम वायां न करी रे तें ॥२॥
तयाची संगती उद्धवा धरावी । सेवा ते करावी काया वाचा ॥३॥
मज तयाचा वेध उद्धवा प्रसिद्ध । तूं सर्वभावें सदगद नाम घेई ॥४॥
ज्याची आवडी मजसी उद्धवा । जाई तया ठायां प्रेमभरित ॥५॥
उच्च नीच कांहीं न म्हणें उद्धवा । एका जनार्दनीं तया शरण जावें ॥६॥

अभंग १४८१

उद्धव बोले कृष्णाप्रती

उद्धव बोले कृष्णाप्रती । ऐकोनि संतांचीं कीर्ति । धन्य वैष्णव होती । कलीमाजीं ॥१॥
तुम्हां जयाचा निजछंद । मानीतसा परमानंद । अखंड तयाचा वेध । तुमचें मनीं ॥२॥
ऐशी याची संगती । मज घडो अहोरातीं । नये पुनरावृत्ती । पुनः जन्मासी ॥३॥
हर्ष देव सांगे आपण । उद्धवा तयाचें मज ध्यान । एका जनार्दनीं शरण । ते मज आवडती ॥४॥

अभंग १४८२

मज तयांची आवड

मज तयांची आवड । पुरवणें लागे त्याचें कोड । गर्भवास सांकड । तयालागी उद्धवा ॥१॥
घेऊनी अवतार । करी दृष्टांचा संहार माझा हा बडिवार । तयाचेनि उद्धवा ॥२॥
माझें जप तप अनुष्ठान । देव पूजा मंत्र पठण । नाना नेमादि साधन । संत माझे उद्धवा ॥३॥
मज आणिलें नामरुपा । त्याची मजवर कृपा । दाविला हो सोपा । मार्ग मज उद्धवा ॥४॥
माझा योगयाग सर्व । संत माझें वैभव । वैकुंठादि राणीव । तयाचेनि मज उद्धवा ॥५॥
ऐसें वरिष्ठ पावन । पुनीत केलें मजलागून । एका जनार्दनीं शरण । तयांसीच उद्धवा ॥६॥

अभंग १४८३

मीही संतचरण वंदीतसे माथां

मीही संतचरण वंदीतसे माथां । वेदादि साम्यता थोडी तेथें ॥१॥
पुराणासी धाड पडलें सांकडे । शास्त्रांचें तें कोडे उगवेल ॥२॥
अहं ब्रह्मा ऐशा श्रुति वेवादती । नेति त्या म्हणती तटस्थ ठेल्या ॥३॥
उपासनामार्ग परंपरा जाला । तो बोध तुला सांगितला ॥४॥
एका जनार्दनीं संतांचा सांगत । न चुको देऊं हित आपुलें तूं ॥५॥

अभंग १४८४

भांबावला देव संतामागें धावें

भांबावला देव संतामागें धावें । उघडाचि प्रभवे पंढरीये ॥१॥
युगें अठ्ठावीस पुंडलिकासाठीं । उभा जगजेठी विटेवर ॥२॥
यावे तया द्यावें क्षेमालिंगन । पुसावा तो शिणभाग त्यास ॥३॥
कुर्वाळुनी करें धरी हनुवटी । म्हणे मजसी भेटी तुमची झाली ॥४॥
लाघव तयासी दावी आपुले बळें । पुरवावे लळे सत्य त्याचे ॥५॥
जैशी त्याची भावना आपण पुरवी । एका जनार्दनीं गोंवी आपल्या कडे ॥६॥

अभंग १४८५

ज्या सुखाकारणें देव वेडावला

ज्या सुखाकारणें देव वेडावला । वैकुंठ सांडुनीं संतसदनीं राहिला ॥१॥
धन्य धन्य संतांचें सदन । जेथें लक्ष्मीसहित शोभे नारायण ॥२॥
सर्व सुखांची सुखराशी । संतचरणीं भुक्तिमुक्ति दासी ॥३॥
एका जनार्दनीं पार नाहीं सुखा । म्हणोनि देव भुलले देखा ॥४॥

अभंग १४८६

वैष्णवाघरीं देव सुखावला

वैष्णवाघरीं देव सुखावला । बाहिर नवजे दवडोनि घातिला ॥१॥
देव म्हणे माझें पुरतसें कोड । संगती गोड या वैष्णावांची ॥२॥
जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनि पाहे तंव घराभीतरीं ॥३॥
कीर्तनाची देवा आवडी मोठी । एका जनार्दनीं पडली मिठी ॥४॥

अभंग १४८७

संतापोटीं देव वसे

संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे ॥१॥
ऐसा परस्परें मेळा । देव संतांचा अंकिला ॥२॥
संतांठायीं देव तिष्ठे । देव तेथें संत वसे ॥३॥
एका जनार्दनीं संत । देव तयांचा अंकित ॥४॥

अभंग १४८८

संत ते देव देव ते संत

संत ते देव देव ते संत । ऐसा हेत दोघांचा ॥१॥
देव ते संत संत ते देव । हाचि भाव दोघांचा ॥२॥
संतांविण देवा कोण । संत ते जाण देवासी ॥३॥
फळपुष्प एका पाठीं । एका जनार्दनीं राहाटी ॥४॥

अभंग १४८९

संताअंकीं देव वसे

संताअंकीं देव वसे । देवाअंकीं संत बैसे ॥१॥
ऐशा परस्परें मिळणी । समुद्र तरंग तैसें दोन्हीं ॥२॥
हेम अलंकारवत । तैसे देव भक्त भासत ॥३॥
पुष्पीं तो परिमळ असे । एका जनार्दनीं देव दिसे ॥४॥

अभंग १४९०

संत आधीं देव मग

संत आधीं देव मग । हाचि उगम आणा मना ॥१॥
देव निगुर्ण संत सगुण । म्हणोनि महिमान देवासी ॥२॥
नाम रुप अचिंत्य जाण । संतीं सगुण वर्णिलें ॥३॥
मुळीं अलक्ष लक्षा नये । संतीं सोय दाविली ॥४॥
एका जनार्दनीं संत थोर । देव निर्धार धाकुला ॥५॥

अभंग १४९१

संताचा महिमा देवचि जाणें

संताचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांची पुसणें ॥१॥
ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ॥२॥
बहुत रंग उदक एक । यापरी देव संत दोन्ही देख ॥३॥
संताविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ॥४॥
मागें पुढें नहो कोणी । शरण एका जनार्दनीं ॥५॥

अभंग १४९२

देवाचे सोईरे संत रे जाणावें

देवाचे सोईरे संत रे जाणावें । यापरतें जीवें नाठवी कोणा ॥१॥
पडतां संकट आठवितसे संतां । त्याहुनी वारिता नाहीं दुजा ॥२॥
म्हणोनि घरटी फिरे तया गांवीं । सुदर्शनादि मिरवी आयुधें हातीं ॥३॥
लाडिकें डिंगर वैष्णव ते साचे । एका जनार्दनीं त्याचें वंदी पाय ॥४॥

अभंग १४९३

संत देवाचा लाडका

संत देवाचा लाडका । देव तेणें केला बोडका ॥१॥
अर्थ पाहतां सखोल असे । बोडका देव पंढरी वसे ॥२॥
संत लाडका देव बोडका । म्हणे जनार्दन लाडका एका ॥३॥

अभंग १४९४

पंढरीये देव आला

पंढरीये देव आला । संतभारें तो वेष्टिला ॥१॥
गुळासवें गोडी जैसी । देवासंगें दाटी तैसी ॥२॥
झालें दोघां एकचित्त । म्हणोनि उभाचि तिष्ठत ॥३॥
एका जनार्दनीं भाव । संतापायीं ठेविला जीव ॥४॥

अभंग १४९५

पुंडलिक संत भला

पुंडलिक संत भला । तेणें उद्धार जगाचा केला ॥१॥
तयाचे वंदावें चरण । कायावाचामनें करुन ॥२॥
उपाधिसंग तुटती व्याधी । एका जनार्दनीं समाधी ॥३॥

अभंग १४९६

अंकिला देव संतद्वारीं

अंकिला देव संतद्वारीं । भिक्षा मागें तो निर्धारीं ॥१॥
मज द्याहो प्रेमभिक्षा । देव बोले तया प्रत्यक्षा ॥२॥
नाम गाणें हेंचि दक्ष । एका जनार्दनीं प्रत्यक्ष ॥३॥

अभंग १४९७

संतचरणरज वंदुनीं तत्त्वतां

संतचरणरज वंदुनीं तत्त्वतां । सायुज्य भक्ति माथां पाय देऊं ॥१॥
थोरीव थोरीव संतांची थोरीव । आणिक वैभव कांही नेणें ॥२॥
संतापरतें दैवत नाहीं जया चित्तीं । तोचि एकपुर्णस्थिति ब्रह्माज्ञानीं ॥३॥
संत तोचि देव जयांची वासना । एका जनार्दनीं भावना नाहीं दुजीं ॥४॥

अभंग १४९८

उघड बोलती संत

उघड बोलती संत । जैसा हेत पुरविती ॥१॥
मनीचें जाणती ते सदा । होऊं नेदी विषयबाधा ॥२॥
अज्ञान सज्ञान । तारिती कृपें करुन ॥३॥
संतापायें ज्याचा भाव । तेथें प्रवटेचि देव ॥४॥
एका जनार्दनींबरा । द्यावा मज तेथें थारा ॥५॥

अभंग १४९९

अभक्तां देव कंटाळती

अभक्तां देव कंटाळती । परी सरते करीतीं तंव त्या ॥१॥
म्हणोनि महिमा त्यांचा जगीं । वागविती अंगीं सामर्थ्य ॥२॥
तंत्र मंत्रा नोहे बळ । भक्ति प्रेमळ पाहिजे ॥३॥
आगमानिगमाचा पसारा । उगाचि भारा चिंध्यांचा ॥४॥
वेदशास्त्रांची घोकणी । ती तो कहाणी जुनाट ॥५॥
पुरातन वाटा असती बहु । त्या त्या न घेऊं यामाजी ॥६॥
एका जनार्दनीं सोपा मार्ग । संतसंग चोखडा ॥७॥

अभंग १५००

उदार संत एक जगीं

उदार संत एक जगीं । वागवितीं अंगीं सामर्थ्य ॥१॥
काय महिमा वर्णू दीन । पातकीं पावन करिती जगीं ॥२॥
अधम आणि पापराशी । दरुशनें त्यांसी उद्धार ॥३॥
लागत त्यांच्या चरणकमळीं । पापतांपां होय होळी ॥४॥
एका जनार्दनीं भेटतां । हरे संसाराची चिंता ॥५॥