वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग १ ते ६८

अभंग १

ॐ नमो सदगुरुनिर्गुणा

ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥

हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥

तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण । सदगुरुचें आदरें ॥३॥

अभंग २

नमो व्यासादिक कवी हे पावन

नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचें ॥१॥

करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्त्वतां चालतसे ॥२॥

एका जनार्दनीं तुमचा मी दास । येवढी ही आस पुरवावी ॥३॥

अभंग ३

परा पश्यंती मध्यमा वैखरी

परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥

वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२

आणिक संकल्प नाहीं माझे मनीं । एका जर्नादनीं वंदितसें ॥३॥

अभंग ४

श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी

श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी । म्हणोनि विनवयी करितसों ॥१॥

मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादरा वदवावें ॥२॥

न कळेचि महिमा ऊंच नीचपणे । कृपेंचे पोसणें तुमचे जाहलों ॥३॥

एका जनार्दनी करुनी स्तवन । घातिलें दुकान मोलेंविण ॥४॥

अभंग ५

असतां बंदिशाळें

असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥

गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥

मेळवुनि लेंकुरी । खेळ खेळावा साकार । गोकुळीं अवतार । गौळीया घरीं ॥३॥

वर्षतां शिळाधारीं । उचलवा माहागिरी । वेणु पावे करीं । वाजवीत ॥४॥

जळीं रिघ करावा । भवसर्प नाथावा । वरि बैसो बरवा । भाव माझा ॥५॥

कंसादिक वीर । त्यांचा कारावा संहार । ईजे राज्यधर । उग्रसेना ॥६॥

एक यश द्यावें त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर बसवावें । सिंधुमाजीं ॥७॥

एका जनार्दनीं । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायणा । वासनेचे ॥८॥

अभंग ६

देवकी निज उदरीं

देवकी निज उदरीं । गर्भाजी पाहे थोरी । तंव सबाह्म अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥

अगे हा स्वतः सिद्ध हरी । स्वयंप्रकाश करीं । मीपणा माझारी । गर्भु वाढे ॥२॥

आतां नवल कैसे परी । आठवा गर्भु धरी । त्याहि गर्भा माझारीं मज मी देखे ॥३॥

दाहीं इंद्रियां माझारीं । गर्भांची वाढे थोरी । कर्म तदाकारीं । इंद्रिय वृत्ति ॥४॥

चितप्रकाशासी डोहळे । सद्रूप सोहळे । आनंद कल्लोळे गर्भू वाढे ॥५॥

तेथें स्वस्वरुपस्थिती सुखरुप प्रसुती । आनंद त्रिजगतीं परिपूर्ण ॥६॥

एका जनार्दनी । ज्ञानगर्भु सार । चिद्रुप चराचर । निखळ नांदे ॥७॥

अभंग ७

देवकी करी चिंता

देवकी करी चिंता । केवीं आठवा वांचे आतां । ऐसी भावाना भावितां । जिवीं तळमळ ॥१॥

तंव न दुखतांचि पोट । वेण न लगतां उद्धट । कृष्ण झाला प्रगट । स्वयें अयोनिया ॥२॥

हरि सुनीळ सांवळें । बाळ निजतेजे तेजाळें । देखोनि वेल्हाळे । स्वयं विस्मीत ॥३॥

ऐसें देखोनि श्रीकृष्णासी । मोहे आच्छादुं जाय त्यासी । तंव प्रकाशु तियेंसीं । कैसा आंवरेना ॥४॥

वेगीं वसुदेवातें म्हणे । तुम्हीं गोकुळांसी न्या तान्हें । एका जनार्दनें कृपा केलीं ॥५॥

अभंग ८

देवकी म्हणे वसुदेवासी

देवकी म्हणे वसुदेवासी । वेगीं बाळके न्यावें गोकुळासी । घवघवीत तेजोराशी । देखे श्रीकृष्ण ॥१॥

पूर्ण प्रकाश निजतेजें । पाहतां न दिसें दुजें । तेथें कैंचे माझें तुझें । लपणें छपणें ॥२॥

सरसर अरजे दुरी । परब्रह्मा आम्हां छरीं । अहं कंसाचे भय भारी । बाधी कवणा ॥३॥

सवेचि पाहे लीळा ।मुगुट कुंडले वनमाळा । कंठीं कौस्तुभ तेजाळा । कळी तटी सुत्र ॥४॥

क्षुद्र घंटिका किंकणी । बाहु भूषणें भुषणीं । चिद्रेत्नें महामणी । वीर कंकणें ॥५॥

कमलवदन हरी । कमले नेत्रधारी । लीला कमळे करी । झेलीतसे ॥६॥

करकमळीं कमळा । सेवी चरणकमळा । ऐशी वसुदेव देखे डोळां । दिव्य मूर्ति ॥७॥

लक्ष्मी डवल उनियां जाण । हृदयीं श्रीवत्सलांछन । द्विजापदांचे महिमान । देखे दक्षिणाभागीं ॥८॥

शंख चक्रादि आयुधें चारी । पीतांबर धारी । सगुण निर्गुण हरि । समसाम्य ॥९॥

ऐसे सगुण निर्गुण भाका । पहात पहात देखा । भिन्न भेदाचि न रिघे रेखा । कृष्णापणीं ॥१०॥

एका जनार्दनीं खरें । निजरुप निर्धारें । अहं कंसाचे वावरे । मिथ्या भय ॥११॥

अभंग ९

देवकी वसूदेवाकडे पाहे

देवकी वसूदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदे गर्जताहे । येरी धावोनि धरी पाये । उगे रहा ॥१॥

जळो जळो हे तुमची बुद्धी । सरली संसारशुद्धी । कृष्ण लपवा त्रिशुद्धी । जग प्रगट न करावा ॥२॥

आतां मी करुं कैसें । भ्रतारा लागलें पिंसे । मज मायेच्या ऐसें । पुरुष ममता न धरी ॥३॥

मज मायेची बुद्धी ऐसी । म्यां आच्छादिलें श्रीकृष्णांसी । वेगें होईन तुमची दासी । अति वेगेंशीं बाळ न्यावें ॥४॥

येरु म्हणे नवल जालें । तुज कृष्णें प्रकाशिलें । त्वां केवीं अच्छादिलें । कृषरुप ॥५॥

सरसर अरजे मूढें । बोलसी तितुकें कुडें । कृष्णरुप वाडें कोडें । माया कैंची ॥६॥

येरी म्हणे सांडा चावटी । कोरड्या काय सांगू गोष्टी । गोकुळासी उठाउठी । बाळ न्यावें माझें ॥७॥

अवो कृष्णीं चिंतीसी जन्ममरण । हेंचि तुझें मूर्खपणा । कृष्णानामें जन्ममरण । समूळ निर्दळिलें ॥८॥

सरो बहु बोलाचा बडीवारु । परि निर्धारु न धरवे धीरु । या लगीं लेकरुं । गोकुळा न्यावें ॥९॥

तुम्हीं न माना माझिया बोला । वेणेंवीण उपजला । नाहीं योनिद्वारां आला । कृषाणानाथु ॥१०॥

आतां मी काय करुं वो । वसुदेव म्हणे नवलाओ । तुझ्या बोलाचा अभिप्रावो । तुझा तुमची न कळे ॥११॥

चोज कैसेवीण । ज्या नाहीं जन्ममरण । त्यासी मारील कवण । समुळ वावो ॥१२॥

जेणें मीपण आभासे । तेणें माझें मूर्खपणें तुम्हां दिसें । हें अंगींचे निजरुप पिसें । न कळें तुम्हां ॥१३॥

कृष्ण निजबोधु सुंदरा । यासी जीवें जतन करा । जाणिवेच्या अहंकारा । गुंता झणीं ॥१४॥

आतां काय मीं बोलुं शब्दू । ऐसा करितां अनुवादू । बोले खुंटला शब्दू । प्रगटला कृष्ण ॥१५॥

प्रकृति पुरुष दोन्हीं । मीनली एकपणीं । एका जनार्दनीं । बंदी मोक्ष ॥१६॥

अभंग १०

श्रीकृष्ण न्यावा गोकुळा

श्रीकृष्ण न्यावा गोकुळा । पायीं स्नेहाच्या शृंखळा । कायाकपटीं अर्गळा । मोहममतेच्या ॥१॥

कृष्णीं धरितां आवडी । स्वयें विराली स्नेहाची बेडी । मुक्तद्वारा परवडी । नाहीं अर्गळा शृखंळा ॥२॥

कृष्ण जंव नये होतां । तंवचि बंधनकथा । पावलीया कृष्णानाथा । बंदी मोक्ष ॥३॥

ते संधि रक्षणाईते । विसरली रक्षणातें । टकमकीत पहाते । स्वयें कृष्ण नेतां ॥४॥

श्रीकृष्ण अंगशोभा । नभत्व लोपलें नभा । दिशेची मोडली प्रभा । राखते कवण ॥५॥

अंधारामाजी सूर्य जातु । श्रीकृष्णासी असे नेतु । सत्व स्वभावें असे सांगतु । कृष्णाकडिये पडियेला ॥६॥

अंध ते बंधन नेलें । राखतो राखणे ठेलें । एका जनार्दनी केलें । नित्य मुक्त ॥७॥

अभंग ११

तीरा आणिला श्रीकृष्ण

तीरा आणिला श्रीकृष्ण । हरिखे यमुना झाली पुर्ण । चढ़े स्वानंदजीवन । चरण वंदनार्थ ॥१॥

वसुदेव म्हणे कटकटा । यमुना रोधिली वाटा । कृष्ण असतां निकटा । मोहं मार्ग न दिसे ॥२॥

कृष्ण असतां हातीं । मोहें पडली भ्रांति । मोहाचिये जाती । देव नाठवे बा ॥३॥

मैळ मुकी वेताळ । मारको मेसको वेताळ । आजी कृष्ण राखा सकळ । तुम्हीं कुळदेवतांनी ॥४॥

अगा वनींच्या वाघोबा । पावटेकीच्या नागोबा । तुम्ही माझिया कान्होंबा । जीवें जतन करा ॥५॥

हातींचा कृष्ण विसरुन । देव देवता होतों दीन । मोहममतेचें महिमान । देवा ऐसें आहें ॥६॥

मोहें कृष्णांची आवडी । तेथें न पडे शोक सांकडीं । एका जनार्दनीं पावलें परथडी । यमुनेच्या ॥७॥

अभंग १२

गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ

गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ । वसुदेवास माया प्राप्त । तेणें पावला त्वरित । देह बंदिशाळे ॥१॥

तंव तुटली जडली बेडी । कपाटा पडली कडी । भव भयाच्या कडाडी । अहं कंस पावे ॥२॥

श्रीकृष्ण सांडिला मागें । पंचमहाभूत पाठी लागे । मिथ्या बंधन वाउगें । उठी मरण भये ॥३॥

कंस पुसे लवलाह्या । काय प्रसाली तुझी जाया । म्हणोनी आणिली योगमाया । वसुदेवें ॥४॥

वेगें देवकी म्हणे । कंस पुसेल जेव्हां तान्हें । तेव्हा तुवां देणें । हे तया हातीं ॥५॥

ते तें देतां देवकी जवळी । गर्जे ब्रह्मांड किंकाळी । टाहो फुटली आरोळी । दैत्या निधीची ॥६॥

तेणें दचकलें दुर्धर । कामक्रोधादि असुर । कंस पावला सत्वर । धरावयासी ॥७॥

वेंगीं आठवा आणवी । तंव हातां आली आठवीं । कंस दचकला दुर्धर जीवीं । नोहें जालेंचि विपरित ॥८॥

आठवा न दिसे डोळां । आठवी पडली गळां । कर्म न सोडी कपाळा । आलें मरण मज ॥९॥

परासि मारितां जाण । मारिल्या मारी मरण । कंस भीतसे आपण । कृष्ण भय करी ॥१०॥

आठवीं उपडितां तांतडीं । तंव तें ब्रह्मांड कडाडी । हातांतुन निष्टली हडबडी । कंस भयाभीतु ॥११॥

तंव ते गर्जलीं अंबरीं । पैले गोकुळीं वाढे हरी । तुज सगट बोहरी । करील दैत्याकुळाची ॥१२॥

वधिता देवकीचीं बाळें । माझें पाप मज फळलें । माझें निजकर्म बळें । आलें मरण मज ॥१३॥

भय संचलें गाढें । तेणें पाऊल न चले पुढें । पाहतां गोकुळाकडे । मूर्च्छित कंस बा ॥१४॥

आसनीं भोजनीं शयनीं । भये क्रृष्ण देखे नयनीं । थोर भेदरा मनीं । जनीं वनीं हरी देखे ॥१५॥

कृष्ण भयाचें मथित । कंसपणा विसरे चित्त । एकाजनार्दनी भक्त । भयें जीवन्मुक्त ॥१६॥

अभंग १३

गोकुळीं आनंद जाहला

गोकुळीं आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला । नंदाच्या दैवाला । दैव आलें अकस्मात ॥१॥

श्रावण वद्य अष्टमीसीं । रोहिणी नक्षत्र ते दिवशी । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटलीं ॥२॥

आनंद ब समाये त्रिभुवनी । धांवताती त्या गौळणी । वाण भरुनी नंदराणी । सदनाप्रती ॥३॥

एका जनार्दनी अकळ । न कळे ज्याचें लाघव सकळ तया म्हणती बाळ जो म्हणती बाळ । हालविती ॥४॥

अभंग १४

एक धांवुनी सांगिती

एक धांवुनी सांगिती । अहो नंदराया म्हणती । पुत्रसुख प्राप्ति । मुख पहा चला ॥१॥

सर्वें घेऊनि ब्राह्माण । पहावया पुत्रवदन । धावूंनियां सर्वजण । पहावया येती ॥२॥

बाळ सुंदर राजीवनयन । सुहास्यवदन घनः श्यामवर्ण । पाहूनियां धालें मन । सकळिकांचे तटस्थ ॥३॥

पाहूनि परब्रह्मा सांवळा । वेधलें मान तमालनीळा । एका जनार्दनी पाहतां डोळा । वेधें वेधिलें सकळ ॥४॥

अभंग १५

वेधल्या गोपिका सकळ

वेधल्या गोपिका सकळ । गोवळ आणि गोपाळ । गायी म्हशी सकळ । तया कृष्णाचें ध्यान ॥१॥

नाठवें दुजें मनीं कांही । कृष्णावांचुनीं आन नाहीं । पदार्थमात्र सर्वही । कृष्णाते देखती ॥२॥

करितां संसाराचा धंदा । आठविती त्या गोविंदा । वेधें वेधल्या कृष्णाछंदा । रात्रंदिवस समजेना ॥३॥

एका जनार्दनी छंद । ह्रुदयीं तया गोविंद । नाहीं विधि आणि निषेध । कृष्णावांचुनी दुसरा ॥४॥

अभंग १६

गोकुळीच्या जना ध्यान

गोकुळीच्या जना ध्यान । वाचे म्हणती कृष्ण कृष्ण । जेवितां बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व ॥१॥

ध्यानी ध्यती कृष्णा । आणिक नाहीं दुजी तृष्णा । विसरल्या विषयध्याना । सर्व देखती कृष्ण ॥२॥

घेतां देतां वदनीं कृष्ण । आनं नाहीं कांही मन । वाचा वाच्य वाचक कृष्ण । जीवेंभावें सर्वदा ॥३॥

कृष्णारुपीं वेधली वृत्तीं । नाहीं देहाची पालट स्थितीं । एका जनार्दनी देखती । जागृती स्वप्नी कृष्णांतें ॥४॥

अभंग १७

व्रजात कोणे एक वेळेशी

व्रजात कोणे एक वेळेशी । आले गर्गाचार्य ऋषी । त्यासी दाखवितां कृष्नासी । चिन्हें बोलतां झाला ॥१॥

यशोदेबाई ऐक पुत्राची । लक्षणे ॥धृ ॥

मध्ये मुख्य यशोदा बाळा । सन्मुख रोहिणी वेल्हाळा । भोवंता गोपिकांचा पाळा । त्या गोपाळा दाखविती ॥२॥

करील दह्मा दुधाची चोरी । भोगिल गौळियांच्या पोरी । सकळ सिंदळांत चौधरी । निवडेल निलाजरा ॥३॥

चोरुनी नेईल त्यांची लुगडीं । त्यांचे संगे घेईल फुगडी । मेळवुनी गोवळ गडी । सुगडी फोडी शिंकींची ॥४॥

पांडव राजियाचे वेळीं । काढील उष्टया पात्रावळी । ढोरें तुमच्या घरची वेळीं । निवडेल निलाजरा ॥५॥

यावरी कलवंडतील झाडें । लत्ता खळाळ हाणील घोडे । महा हत्ती धरील सोंडे । परी ती विघ्रे मावळतीं ॥६॥

यावरी गाडा एक पडावा । अथवा डोहामाजीं बुडावा । वावटुळीनें उडुनी जावा । सांपडावा वैरियाला ॥७॥

कारण सच्चिदानंदाचें । बीज नोहे हें नंदाचें । जन्मांतर गोविंदाचें । नव्हें कथिल्य मथिल्यांचे ॥८॥

हृदयीं श्रीवत्सलांछन । ब्राह्मणलत्तेचें भूषण । हा होईल ब्राह्मणा जन । एका जनार्दनीं घरींचा ॥९॥

अभंग १८

निळी कांच भूमीं खेळे वनमाळी

निळी कांच भूमीं खेळे वनमाळी । पाहिलें प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं ॥१॥

रडूं घेतलें रडूं घेतलें । समजावी यशोदा परी रडूं घेतलें ॥२॥

दे मज खेळावया भानु । आन नको कांही दुजा छंद मनु ॥३॥

एका जनार्दनीं देव छंद धरी गा । समजावी यशोदा परी न राहे उगा ॥४॥

अभंग १९

शुद्ध स्फटिके आपुलें रुप देखे

शुद्ध स्फटिके आपुलें रुप देखे । कृष्ण तेणें हारिखें डोलतसे ॥१॥

देहाविदेहा आलिंगन स्वानंदें चुंबन । तये संधीं मन हारपत ॥२

स्वस्वरुपीं भेटीं थोर उल्हास पोटीं । उन्मळींत दाष्टी निजरुप पाहें ॥३॥

हें जाणोनि माया धावे लावलाह्मा । उचलोनि कान्हाया दृश्य दावी ॥४॥

माझें रुप मज देई घालितो लोळणी । जननी नानागुणी बुझावीत ॥५॥

माया मोहं गुणाचे खेळणें । येथें कृष्ण म्हणे जीवेभावें ॥६॥

देह घटाबाहेरी न वचें मी मुरारी । श्रद्धा उष्ण भरी तावितसे ॥७॥

विषय पंचधारा देइन बा साकर । नाथिली करकर कां करिसी ॥८॥

घेई स्तनपान वोरसु इंद्रियां गोरसु । मायेसी उदासू रुसूं नको ॥९॥

इच्छा माउलीची साय सावकाश खाय । गोगोरसाची माय मज चाड नाहीं ॥१०॥

तो तंव ठाईच्या ठाई म्यां तव काहीं नेले नाहीं । निजरुप पाही जैंसे तैसें ॥११॥

तुझी पडलीया पडसाई असतांचि जालें नाहीं । नास्तिक तेचि डोई सबळ जाले ॥१२॥

तुझिया सांगातें करणें आणि भुतें । अहंकारें थिते चोरुनि नेलीं ॥१३॥

दुजेपणें पाहतां धरितां नये हातां । निजरुपा तत्त्वतां काढोनि देई ॥१४

होसी चक्रचाळ घाइसी आळ । बाळलीळा खेळ निर्वाणीचा ॥१५॥

मज मायावेगळा नवचे बा गोपाळा । आपरुपीं खेळा खेळू नको ॥१६॥

नेणों कैशी आवडी माया म्हणसी कुडी । भूली नव्हें खोडी तान्हुलिया ॥१७॥

हें नायके उत्तर म्हणे परती सर । निजरुपी साचार दावीं मज ॥१८॥

यापरी कान्हया स्वरुपीं थाया । बुझावितां माया वेढोनि गेली ॥१९॥

आपुलैया स्वप्रभा आपण पावे शोभा । सबाह्म कृष्ण उभा एकपणें ॥२०॥

माया मोहकता गुणाची वार्ता । कृष्णापणीं एकत्वेंची ॥२१॥

एक जनार्दनी निजीं निज मिळणी । सगुणी निर्गुणीं कृष्ण एक ॥२२॥

अभंग २०

एके दिनी नवल जालें

एके दिनी नवल जालें । ऐकवें भावें वहिलें ॥१॥

घरीं असतां श्रीकृष्ण । योगीयाचें निजध्यान ॥२॥

नंद पूजेसी बैसला । देव जवळी बोलाविला ॥३॥

शाळीग्राम देखोनि । मुखांत घाली चक्रापाणी ॥४॥

नंद पाहे भोवतालें । एका जनार्दनी बोले ॥५॥

अभंग २१

म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई

म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरू लवलाही वदन पसरी ॥१॥

चवदा भुवनें सप्त तीं पाताळें । देखियलीं तात्काळें मुखमाजीं ॥२॥

स्वर्गीचे देव मुखामाजी दिसती । भुलली चित्तवृत्ति नंदराव ॥३॥

एका जनार्दनी नाठवें भावना । नंद आपणा विसरला ॥४॥

अभंग २२

घालुनी माया म्हणे नंदराया

घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ॥१॥

संसारसुख भोगाल चिरकाळ । परब्रह्मा निर्मळ तया भजे ॥२॥

नंद म्हणे देव दूर आहे बापा । आम्हांसी तो सोपा कैसा होये ॥३॥

ऐकातांचि वचन काय करी नारायण । प्रगटरुप जाण दाखविलें ॥४॥

शंख चक्र गदा पद्म तें हस्तकीं । मुगुट मस्तकीं शोभायमान ॥५॥

ऐसा पाहतां हरी आनंद पैं झाला । एका जनार्दनी भेटला जीवेंभावें ॥६॥

अभंग २३

सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें

सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें । खेळें तें वहिलें वृंदावनीं ॥१॥

नागर गोमटें शोभे गोपवेषें । नाचत सौरसे गोपाळासीं ॥२॥

एका जनार्दनीं रुपासी वेगळें । अहं सोहमा न कळें रुप गुण ॥३॥

अभंग २४

वेदादिक श्रमले न कळे जया पार

वेदादिक श्रमले न कळे जया पार । शस्त्रांसी निर्धार न कळेची ॥१॥

तो हा श्रीहरी नंदाचिया घरीं । क्रीडे नानापरी गोपिकांसी ॥२॥

चोरावया निघे गोपिकांचें लोणी । सौगडें मिळोनी एकसरें ॥३॥

एका जनार्दनी खेळतसे खेळा । न कळे अकळ आगमनिगमां ॥४॥

अभंग २५

मेळेवानि मुलें करावी हे चोरी

मेळेवानि मुलें करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्न ॥१॥

पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहींदूधा ॥२॥

सांडिती फोडिती भाजन ताकाचें । कवळ नवनीताचे झेलिताती ॥३॥

एका जनार्दनीं नाटकी तो खेळ । न कळे अकळ वेदशास्त्रां ॥४॥

अभंग २६

पाळतोनि जाती घरासी तात्काळ

पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ॥१॥

गोपाळ संवगडे मेळावोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ॥२॥

निजलियाच्या मुखा माखिती नवनीत । नवल विपरित खेळताती ॥३॥

न कळे लाघव करी ऐशीं चोरी । एका जनार्दनी हरीं गोकुळांत ॥४॥

अभंग २७

मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी

मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ॥१॥

धाकुल सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ॥२॥

ठेवियलें लोणी काढितो बाहेरी । खाती निरंतरी संवगडी ॥३॥

एका जनार्दनीं तयाचें कौतुक । न पडे ठाऊके ब्रह्मादिकां ॥४॥

अभंग २८

मिळती गौळणी दारवटीं बैसती

मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरुं आतां निश्चिती घरामध्यें ॥१॥

येतो जातो हें न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥

पांच सात बारा होऊनियां गोळा । बैसती सकळां टकमक ॥३॥

एका जनार्दनी न सांपडेचि तयां । योगी ध्याती जया अहर्निशीं ॥४॥

अभंग २९

आहर्निशी योगी साधिती साधन

आहर्निशी योगी साधिती साधन । तयासी महिमान न कळेची ॥१॥

तो हा श्रीहरी बाळवेषें गोकुळीं । खेळे वनमाळी गोवाळीयांसीं ॥२॥

एका जनर्दनीं न कळे महिमान । तटस्थ तें ध्यान मुनीजनीं ॥३॥

अभंग ३०

न सांपडे हाती वाउगी तळमळ

न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ॥१॥

बैसती समस्ता धरु म्हणोनि धावे । तंव तो नेणवें हातालागीं ॥२॥

समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारें । नेणेवेचि खरे येतो जातो ॥३॥

एका जनार्दनी न सांपडेचि तयां । बोभाट तो वायां वाउगाची ॥४॥

अभंग ३१

वाउगे ते बोल बोलती अबळा

वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरुं शके ॥१॥

प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्यें ॥२॥

एका जनार्दनीं गोपीकांसीं शीण । म्हणोनि विंदान करीतसे ॥३॥

अभंग ३२

नवल ती कळा दावी गोपिकांसी

नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥

धाकुले संवगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशी भीतरीं आपणची ॥२॥

द्वारा झाकानियां बैसती गोपिका । देखियला सखा गोपाळांचा ॥३॥

एका जनार्दनीं धावुनि धरति । नवल ते रिती करितसे ॥४॥

अभंग ३३

गोपी धावुनियां धरिती तयातं

गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं ॥१॥

करिती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ॥२॥

कां रें चोरा आतां कैसा सांपडलासी । म्हणोनि हातासी धरियलें ॥३॥

वोढोनियां नेती यशोदे जवळी । आहे वनमाळी कडेवरी ॥४॥

एका जनार्दनी यशोदेचे करीं । उभा श्रीहरी लोणी मागें ॥५॥

अभंग ३४

घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा

घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥

पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२

गोपिका धांवती घेऊनियां कृष्ण । न कळे विंदान कांहीं केल्या ॥३॥

घेऊनियां येती तटस्थ पाहती । विस्मित त्या होती आपुले मनीं ॥४॥

एका जनार्दनींदावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिकां ॥५॥

अभंग ३५

मिळल्या गिपिका यशोदा जवळा

मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥

यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥

एका जनार्दनीं बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥

अभंग ३६

आपुलिया घरा जाती मुकवत

आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं ॥१॥

परस्परें बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥

धरुनिया करीं जाती तेथवरी । उभा असे हरी जवळींच ॥३॥

एका जनार्दनीं न कळें लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजीं ॥४॥

अभंग ३७

आपुल्या मनासीं करिती विचार

आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं ॥१॥

योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणतीं ॥२॥

धारितां न धरवे तळमळ । वाउगा कोल्हाळ करिती वायां ॥३॥

एका जनार्दनीं शुद्ध भक्तिविण । पवे नारायण कवणा हातीं ॥४॥

अभंग ३८

आभाविकांसी तो जवळीचा दुरीं

आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥
म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥

वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासें सायास शिणताती ॥३॥

एका जनार्दनींशीण गोपीकांसी । तेणें हृषीकेशी हांसतांसे ॥४॥

अभंग ३९

न कळती भावेवीण रामकृष्ण

न कळती भावेवीण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची ॥१॥

बहुत मिळती बहुतांच्या मतां । तैशां गोपी तत्त्वतां शिणताती ॥२॥

एका जानार्दनीं प्रेमावीण देव । नकळे लाघव श्रीहरींचे ॥३॥

अभंग ४०

भाविका त्या गोपी येतो काकुळती

भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं ॥१॥

मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋण फेडावया ॥२॥

दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शाहणे तयासी न सांपडे ॥३॥

एका जनार्दनीं भाविकांवांचूनी । प्राप्त नोहे जाण देव तया ॥४॥

अभंग ४१

भोळे ते साबडे गोपिका ते भावें

भोळे ते साबडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥

यज्ञमुखीं तोंड करी जो वाकुंडें । तो गोपिकांचे रोकडें लोणी खाये ॥२॥

घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवाविती ॥३॥

एका जनार्दनीं व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे ॥४॥

अभंग ४२

खेळतसे खेळ सवंगडियांसहित

खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥

जयाचिये चित्तीं जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणें ॥२॥

जया जैसा हेत पुरवीं तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ॥३॥

एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ॥४॥

अभंग ४३

गोकुळामाजी कृष्णें नवल केलें

गोकुळामाजी कृष्णें नवल केलें । स्त्री आनि भ्रतारा विंदान दाविलें ॥१॥

खेळ मांडिला हो खेळ मांडिला । न कळे ब्रह्मादिकां अगम्य त्याची लीळां वो ॥२॥

एके दिनीं गृहा गेले चक्रपाणी । बैसोनी ओसरी पाहे पाळतोनी लोनी ॥३॥

गौळणी आली घरां म्हणे शारंगपाणी । चोरीचे विंदान पाळती पाहसी मनीं ॥४॥

चोरी करावया जरी येसी सदनीं । कृष्णा धरुनी तुझी शेंडी बांधीन खांबालागुनी ॥५॥

एका जनार्दनीं ऐसे बोले व्रजबाळी । दाविलेंअ लाघव ब्रह्मादिकां न कळे ते काळीं ॥६॥

अभंग ४४

उठोणि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा

उठोणि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ॥१॥

पती आणि गौळणी एके सेजे पहुडली । बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ॥२॥

धरुनी गोपी वेणी दाढी पतीची बांधिली । न सुटे ब्रह्मादिकी ऐशी गांठ दिधली ॥३॥

करुनी कारण आले आपुले मंदिरा । यशोदे म्हणे कृष्णा काय केलें सुंदरा ॥४॥

जाहला प्राप्तःकाळ लगबग उठे कामिनी । वोढातसे दाढी जागा झाला तो क्षणीं ॥५॥

कां गे मातलीस दिली दाढी वेणी गांठी । एका जनार्दनीं आण वाहे गोरटी ॥६॥

अभंग ४५

उभयतां बैसोनि क्रोधें बोलती

उभयतां बैसोनि क्रोधें बोलती । कैशीं जाहलीं करणी एकमेक रडतीं ॥१॥

गोदोहन राहिलें दिवस आला दुपारी । धाउनी शेजारी येती पहाती नवलपरी ॥२॥

शस्त्रें घेउनियां ग्रंथीं बळे कपिती । कपितांचि शस्त्रें आन कापें कल्पांतीं ॥३॥

घेऊनियां अग्नि लाविताती दाढी वेणी । न जळेचि वन्ही ऐशी केली कृष्णें करणी ॥४॥

ऐसा समुदाव लक्षावधि मिळाला । बोल बोलती बोला भलतेंचि बरळा ॥५॥

धावूंनिया नंदनारायतें सांगती । एका जनार्दनीं नवल विपरित गती ॥६॥

अभंग ४६

नंदे आणिविलें उभयंता राजबिंदी

नंदे आणिविलें उभयंता राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवंतीं जनांची मांदी ॥१॥

येवोनि चावडीये उभयंता रडती । म्हणे नंदराव कैशी कर्मांची गती ॥२॥

अकावरी बैसोनी सांवळा गदगदां हांसें । विंदान दाविले तुज बांधिलें असे ॥३॥

आमुची तूं शेडीं काल बांधीन म्हणसी । न कळे देवाची माव देवें बांधिलें तुजसी ॥४॥

आतां माझी गती कैशीं हरी ते सांगा । करुणाभरीत देखोनि गेलें लागह वेगा ॥५॥

एका जनार्दनी करूणाकर मोक्षदानी । सहज दृष्टी पाहतां सुटली ग्रंथी दोनी ॥६॥

अभंग ४७

आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं

आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशलें भुवनीं ॥१॥

म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ॥२॥

एका जनार्दनीं माझा अपराध नाहीं । जया जैसा भाव तया तोचि देहीं ॥३॥

उठोनि प्रातःकाळीं गोपी येती घरा । आवरीं आवरीं यशोदे आपुलिया पोरा ॥१॥

अभंग ६८

येणें कृष्णें आमुचें खादलं दुध दहीं

येणें कृष्णें आमुचें खादलं दुध दहीं । फोडोनि टाइलें भाजनें पाहीं ॥१॥

आवरी आवरी बाई आपुला कान्हा । न कळे याची कारणी ब्रह्मादिकां नये ध्याना ॥२।।

घेऊनियां पोरें घरामध्यें येतो पाहे । चोरी करुनियां पळुनी जातो लवलाहें ॥३॥

एका जनार्दनीं किती सांगू गार्‍हाणें । पुन्हां आलिया यासी शोक लावीन सत्य जाणे ॥४॥