गोकुळीं गोमाई गवळणी । तिच्या सुना चवघी जणीं । यमुने गेल्या एके दिनीं । त्यांनी कृष्ण पहिला ॥१॥
कृष्णा पाहतां मधुसूदन । मोहिलें चवघीचें मन । कृष्ण कृष्ण लागलें ध्यान । देहभान विसरल्या ॥२॥
सर्वें एके होती शेजारीण । आली सदनासी धांवुन । गोमाईसी वर्तमान । अवघे विदित केलें ॥३॥
राखी लपवी आपुल्या सुना । सुनेचें नख दृष्टी पडुं देइना । जर कां येशील माझे सदना नासिका चुना तीन बोटें ॥४॥
कृष्ण काय म्हणे तिसीं । येणें जाणें नाहीं आम्हांसी । जें कां वदली रमनेसे । तिची प्राप्ती तुजलागीं ॥५॥
देव ब्राह्मणीचा वेष । धरिता जाला जगन्निवासा । हा रस ऐकतां सायास । मुढ जन उद्धरती ॥६॥
पांढर्या पातलाची कासोटी । जीर्ण चीर वेष्टिलें कंठीं । हाता घेउनी धाकुटी । काठी धरुनी चालिली ॥७॥
वार्यासारखी चाचरी जाये । तोल सांभाळुनी उभी राहे । अवसान धरुनिया पाहें । गोमाइनें देखिली ॥८॥
गोमाई म्हणे अहो ब्राह्मणि । कोठें जातेस आसीस कोठुनी । आशापाश नाहीं कोणी । माझी मीच ऐकली ॥९॥
करुनी आले वाराणाशी । पुढें जाणें रामेश्वरासी । आणिक जाणे बहु तीर्थासे । ऐसी गोमाईसी बोलली ॥१०॥
येवढ्या नगरामध्ये कोणी । दयाळु नाहीं तुजावांचुनी । जागा देई वृंदावनीं । रातचे रात करमीन ॥११॥
अस्ता गेला वासरमणी । सुखें राहें वृदावनी । आज्ञा केली इंद्रालागुनी । सत्वर मेघा पाठवी ॥१२॥
वीज लावली मेघमंडळी । ढग निवाला तेच काळीं । मेघानें सोडिल्या फळीं । जनलोकक पाहतसे ॥१३॥
मेघानें सोडिल्या धारा । थंड गार सुटला वारा । शामाई कांपतसे थरथरां ॥ गोमाइने देखिली ॥१४॥
गोमाई म्हणे अहो साजणी । आंत येई वो ब्राह्मणी । मरुनी जाशील वृंदावनीं । प्रायश्चित्त मजवरी येईल ॥१५॥
मरूनि जाईल वृंदावनीं । परी मी येईना कोणाचे सदनीं । देव राखीव मजलागुनी । ऐशी शामाई बोलली ॥१६॥
इतुका मेघ वर्षला थोर । भिजलें नाहीं तुझे वस्त्र । शामाई म्हणे आम्हांवर । इश्वराची बहु कृपा ॥१७॥
तुम्ही शुद्ध गे ब्राह्मणी । देव तुम्हीं केला ऋणी । आम्ही नरदेहासी येऊनी । प्रपंचसदनीं बुडालों ॥१८॥
दारावाटे बोलावुन । नेत्रीं पाहे अवलोकुन । चक्रपाणी ओळखुन ।चरणीं ठाव मज देई ॥१९॥
आतां उठावेना करुं काई । हाती धरुनि उठवी गोमाई । कवाड उघडोनि लावलाही । बळे सदना लोटलीं ॥२०॥
बळें सदनीं लोटलें मला । मजवर बलात्कार केला । मी सांगेन नंदजीला । म्हणोनी गलबला करितसे ॥२१॥
सदनी जातां तत्क्षाणी । चवघी उद्धरल्या कामिनी । दारापाशी येऊनी । हाकां मारी गोमाई ॥२२॥
गोमाई येऊनी लागे चरणां । पुनीत केल्या आमुच्या सुना । नासिका लावियेला चुना । पाहुन पळे गोविंद ॥२३॥
गोमाई उद्धरली कथा । आपण होऊनि श्रोता वक्ता । एका जनार्दनी दाता । सत्य वार्ता ही माझी ॥२४॥