वारकरी संप्रदाय आणि मुस्लिम धर्म यामध्ये असणाऱ्या वैचारिक समन्वयाची महाराष्ट्राला खुप मोठी परंपरा आहे. याच परंपरेत संत शेख महम्मद महाराजांचा देखील आपणांस उल्लेख करावा लागेल. आजही वारीमध्ये ही एकात्मता आपणाला दिसुन येते. वारकरी संप्रदयात जसे अनेक मुस्लीम पुरुष किर्तनकार तयार झाले तसेच मुस्लीम महिला किर्तनकार देखील तयार झाल्या. यामध्ये ह.भ.प. जैतुनबी यांचे नाव आपणांस सर्वात प्रथम घ्यावे लागेल. बारामती येथील माळेगावात त्यांचे वास्तव्य. वडील मकबुलभाई सय्यद हे गवंडी काम करायचे. वडिलांचे मित्र गुण्याबुवा यांच्यामुळे जैतुनबी यांना वारकरी सांप्रदयाची ओळख झाली. गायनाची आवड असल्यामुळे त्या हरिनामात दंग होऊ लागल्या हे सर्व ज्या काळात घडत होते अर्थातच तो स्वातंत्र्यपुर्व भारताचा काळ होता. त्यामुळे हिंदु-मुस्लीम या दोन धर्मात प्रचंड तणावाचे वातावरण होते. अर्थातच यामुळे मुस्लीम धर्मगुरु आणि कुटुंबाकडुन जैतुनबी यांना विरोध होऊ लागला. अशातच त्यांना श्रीकृष्णाची मुर्ती सापडली त्यामुळे नामस्मरणावर त्यांची श्रद्धा आणखी दृढ झाली. यामुळे घरच्या व धर्मगुरुंच्या विरोधाला त्यांनी निर्धाराने तोंड दिले व विवाह न करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या दहाव्या वर्षी हनुमानदास बैरागी यांच्याकडुन वारकरी संप्रदायाची दिक्षा घेतली आणि त्याच्यांच दिंडीत सहभागी होत पंढरीच्या वारकरी झाल्या. अगदी लहानपणापासुन ज्ञानेश्वरी , गाथा , एकनाथी भागवत या विविध ग्रंथावर त्यांचा अभ्यास सुरु झाला आणि अल्पकाळातच एक अभ्यासू किर्तनकार म्हणुन त्या नावारुपाला येऊ लागल्या. सायकलीवर विविध गावात जावे पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करावे, कमरेला उपरणे गुंडाळावे आणि खड्या आवाजात किर्तन प्रवचन करावे हा त्यांचा दिनक्रम सुरु झाला. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन हरिनामाचा जयघोष करीत असताना सुद्धा त्या नमाज पडत , रोजे करीत. पांडुरंग आणि मोहम्मद पैंगबर यामध्ये त्यांना कधी भेदच जाणवला नाही. “भेदाभेद भ्रम अमंगळ” हे वारकरी तत्वज्ञान त्यांच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले. स्वातंत्रलढ्यातील त्यांची भूमिका महत्वपुर्ण आहे. याकरिता त्यांनी अनेक स्फुर्तीगीते लिहली. १९४२ च्या माधवराव बागल यांच्या सभेत गायलेला त्यांचा पोवाडा अतिशय लोकप्रिय ठरला. पुढे क्रातीसिंह नाना पाटलांचा प्रतिसरकारात देखील त्यांनी काम केले. याबरोबर भागवत धर्माच्या प्रचाराचे काम अखंड सुरुच होते. साध्या सोप्या भाषेत अभंगाचे निरुपण त्या करीत त्यामुळे त्यांच्या किर्तनाला मोठ्या प्रमाणात लोक जमा होत. ६१ वर्षे त्यांनी मनोभावे पंढरीची वारी केली. ६२ व्या वारीत सहभागी झाल्यानंतर रात्री त्यांनी नियमाने किर्तन केले व पहाटेच्या वेळी दिनांक ७ जुलै २०१० रोजी पालखी सोहळा पुणे येथे मुक्कामी असताना त्यांनी देह ठेवला. त्यांच्या आचरणसंपन्न जगण्याने संत शेख महम्मंद यांची आठवण होते. ऐसे केले या गोपाळे | नाही सोवळे ओवळे || काटे केतकीच्या झाडा | आंत जन्मला केवडा || फणसाअंगी काटे | आंत अमृताचे साठे || नारळ वरूता कठिण | परी अंतरी जीवन || शेख मंहमंद अविंध | त्याचे ह्रदय गोविंद ||