पाशांकुशा एकादशीची व्रतकथा पुराणात आढळून येते. प्राचीन काळात क्रोधन नामक एक क्रूर पारधी विंध्य पर्वतावर राहत असे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हिंसा, मद्यपान, लोकांना लुटणे, फसवणे, कपट करणे यांसारखी वाईट, चुकीची कामे करण्यात व्यतीत केले. कालांतराने त्याचा मृत्यूजवळ आल्यावर यमराजांनी दोन दूतांना पाठवून, उद्या तुझा मृत्यू होणार आहे, असे त्याला सांगितले. मृत्यूचे नाव ऐकताच तो प्रचंड भयभीत झाला. महर्षी अंगिरा यांना शरण जात यावर उपाय विचारला. तेव्हा महर्षी अंगिरा यांनी क्रोधनला पाशांकुशा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. क्रोधनने मनोभावे हे व्रत केले. या व्रतामुळे त्याच्या सर्व पापांचा नाश झाला आणि त्याला मोक्ष प्राप्ती झाली, अशी व्रतकथा असल्याचे सांगितले जाते.