तुकाराममय_विष्णु...

चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट म्हणून 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाचे नाव घेतले जाते. परंतु त्या अगोदरच 'संत तुकाराम' या चित्रपटाची निर्मिती झाली होती. दुर्दैवाने त्याची प्रिंट जळाल्यामुळे तो कुठे प्रदर्शित होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे भारताचा पहिला सुपरहीट (सर्वात यशस्वी ) चित्रपट कोणता हेही अनेक जणांना ज्ञात नाही. तो होता विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख दिग्दर्शित १२ डिसेंबर १९३६ रोजी प्रदर्शित झालेला 'संत तुकाराम`. इटलीतील व्हेनिस येथे पार पडलेल्या चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला जगातील सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. एकाच प्रभात चित्रपट गृहात हा चित्रपट वर्षाभरापेक्षा जास्त काळ चालला होता आणि त्याने अभूतपूर्व यश संपादन केले होते. हा त्या काळातील मोठा उच्चांक होता. बैलगाड्या करून कुटुंबातील अबाल वृद्ध हा चित्रपट पाहण्यासाठी जात होते. विशेष म्हणजे पादत्राणे बाहेर काढुन प्रेक्षक चित्रपटगृहात प्रवेश करत होते आणि अत्यंत भक्तीमय वातावरणात चित्रपटाचा आनंद घेत होते.

या चित्रपटात संत तुकाराम महाराजांची भूमिका विष्णूपंत पागनीस यांनी साकारली होती. ते त्या काळातील प्रसिद्ध अभिनेते आणि गायकही होते. १५ नोव्हेंबर १८९२ रोजी जन्मलेल्या या चतुरस्त्र जेष्ठ रंगकर्मीने बालपणापासून नाटकात आणि चित्रपटात अनेक भूमिका केल्याच परंतू त्याचबरोबर स्त्रीपात्र देखील साकारले होते. तरीही खऱ्या अर्थाने त्यांना प्रसिद्धी संत तुकाराम या चित्रपटातील भूमिकेमुळे मिळाली कारण त्यांनी ही भूमिका अत्यंत समरस होऊन केली होती. चित्रीकरण चालू होण्याच्या आधी तुकोबारायांच्या देहूत येऊन ते संत तुकाराम महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले होते.या भूमिकेमुळे ते अजरामर झाले आणि लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर पोहोचले. संत तुकाराम महाराजांचे मुळ छायाचित्र आज कुठेही उपलब्ध नाही. परंतु विष्णूपंत पागनीस यांनी तुकोबारायांच्या केलेल्या भूमिकेचा फोटो भक्तिभावाने पूजला जायचा. आजही तुकाराम महाराज म्हटले की या चित्रपटातील विष्णुपंत पागनीसांची छबी डोळ्यासमोर उभी राहते. त्यांनी तुकाराम महाराजांची भूमिका केली नव्हती तर स्वतः अंतर्बाह्य तुकाराममय होऊन ते संत तुकाराम महाराजांची भूमिका

जगले होते. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या त्रिवेणी संगमात नखशिखांत ते न्हाउन निघाले होते. शेवट पर्यंत ते त्या तुकाराम महाराजांच्या वेशभूषेमध्येच जगात वावरत होते, तसेच आचरण करत होते. तुकोबारायां प्रमाणे "देव पाहावयासी गेलो आणि देवची होउनी ठेलो " अशी अनुभूती त्यांनाही प्राप्त झाली होती. लोकही त्यांना महाराज म्हणत आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होत.

या चित्रपटाचे निर्माते मानधन देण्यासाठी विष्णूपंत पागनीस यांना भेटायला गेले, त्यावेळी त्यांनी मानधन घेण्यास स्पष्ट नकार दिला. निर्मात्याला वाटले हा चित्रपट खूप यशस्वी झाल्यामुळे विष्णूपंतांना कलाकार म्हणून जास्त मानधनाची अपेक्षा असेल. त्यामुळे त्यांनी दुप्पट, चारपट मानधन त्यांना देऊ केले. परंतु तरीही विष्णूपंतांनी ते मानधन स्वीकारण्यास नकार दिला. निर्मात्यांनी कारण विचारल्यावर ते म्हणाले " आयुष्यभर निस्वार्थी आणि वैराग्य संपन्न जीवन जगलेल्या तुकाराम महाराजांच्या भमिकेने मला अजरामर केले, मग त्या भूमिकेसाठी मी मानधन कसं घेऊ ? मानधना पलिकडे या भूमिकेने मला खूप काही दिलं आहे. म्हणून मी या मानधनाचा स्वीकार करणार नाही."

यानंतरही त्यांनी संत तुलसीदास,नरसी भगत,महात्मा विदुर, भक्तराज,रामराज्य अशा चित्रपटात भूमिका केल्या.त्यांनी गायलेले वंदे मातरम् हे गीत प्रसिद्ध झाले होते.ते काया वाचा मनाने चित्रपट क्षेत्रात अनेक वर्षे वावरले

पण ते संत तुकाराम या भूमिकेतुन बाहेर पडु शकले नाहीत. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वैराग्य संपन्न जीवन व्यतीत केले.

उपलब्ध माहिती नुसार पंढरपुर मध्ये ३ ऑक्टोबर १९४३ ला संत तुकाराम या नाटकाचा प्रयोग होता. या नाटकात देखील विष्णूपंत पागनीस संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारत होते. तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाचा शेवटचा प्रसंग चालू होता. अचानक ते खाली कोसळले, क्षणात त्यांची प्राणज्योत मालवली आणि तुकाराममय विष्णू वैकुंठवासी झाले.

🖊️लेखक:- ह.भ.प.प्रशांत महाराज मोरे देहूकर

आंतरराष्ट्रीय कीर्तनकार,व्याख्याते संत साहित्याचे अभ्यासक, लेखक,संशोधक.