पंढरीहूनि गावा जाता । खंती वाटे पंढरीनाथा ।।

आता बोळवीत यावे । आमुच्या गावा आम्हांसवें ।।
सदगदित कंठ । फुटो पाहे हृदय ।।
निळा म्हणे पंढरीनाथा । चला गावा आमुच्या आता ।।

पौर्णिमेला पालख्या गोपाळपूर येथे जाउन काला करतात. काला झाल्यावर साधारण दुपारी पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु होतो . परत येताना पालखीसोबत गर्दी खूपच कमी असते. रोज अधिक वेळ चालून अधिक अंतर पार पाडतात. त्यामुळे परतीचा प्रवास कमी दिवसांचा असतो. उदाहरणार्थ – सोपानकाकांच्या पालखीला पंढरपूरला जायला १३ ते १४ दिवस लागतात. तर परत येताना ७ दिवस लागतात. ज्ञानेश्वर माउली व सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यात परतीच्या प्रवासात रात्रीच चालायला सुरवात 


पहाटे तीन वाजता काकड आरती होऊन पालखी निघते . पादुकांची सकाळची पूजा पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी होते . याच ठिकाणी आंघोळी व जेवण होउन त्यानंतर पुन्हा सायंकाळी ६ पर्यंत प्रवास होतो. परत येताना प्रत्येक दिंडीतील किमान विणेकरी सोबत असतात. थोडे टाळकरी व बहुतेक वीणेकरी असे दृष्य असते. 

पालखी सोहळा गावामध्ये परत आल्यावर गावकऱ्यांतर्फे पालखीचे स्वागत केले जाते. पालखी मार्गावर सडे रांगोळ्या घालतात. काही गावामध्ये बँड अथवा अन्य वाजंत्री लावून पालखीचे स्वागत करतात. ज्ञानेश्वर माउली व तुकोबांच्या पालखीमधले घरी गेलेले काही वारकरी या दिवशी पुन्हा या ठिकाणी येतात. पालखी सोहळा मंदिरात आल्यावर अभंग, आरती होऊन मानकऱ्यांना नारळप्रसाद दिला जातो.
यावेळेस पुढील अभंग होतो. 


पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।।
घरा आले घरा आले । घरा आले गोपाळ ।।
सांभाळिले सांभाळिले । सांभाळिले अनाथा ।।
केला निळा केला निळा । केला निळा पावन ।।